

जळगाव : प्रतिनिधी
जुन्या भांडणाच्या कारणावरून रामचंद्र प्रल्हाद कोळी (वय ५८, रा. आसोदा, ता. जळगाव) यांच्यासह त्यांचा मुलगा व मेहुण्याला ४ जणांनी मारहाण करीत कुऱ्हाडीने वार केले. ही घटना दि. २५ ऑक्टोबर रोजी आसोदा येथे घडली. याप्रकरणी तालुका पोलिसात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आसोदा येथे जुन्या भांडणातून पुन्हा वाद होऊन रामचंद्र कोळी व त्यांचा मुलगा योगेश कोळी यांना मारहाण करण्यात आली. तसेच योगेश याला कुऱ्हाड मारून दुखापत केली. त्या वेळी रामचंद्र कोळी यांचे मेहुणे कैलास सुखा कोळी हे भांडण सोडवण्यासाठी गेले असता त्यांनाही मारहाण करण्यात आली. या प्रकरणी रामचंद्र कोळी यांनी तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अशोक लालचंद कोळी, दुर्गादास अशोक कोळी, विलास बाळू कोळी, विकास बाळू कोळी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक फौजदार सुनील पाटील करत आहेत.



