Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » दिवाळीत भेसळ थांबवा, जळगावकरांचे आरोग्य वाचवा : मनसेने अन्न व औषध प्रशासनाला दिलं निवेदन
    जळगाव

    दिवाळीत भेसळ थांबवा, जळगावकरांचे आरोग्य वाचवा : मनसेने अन्न व औषध प्रशासनाला दिलं निवेदन

    editor deskBy editor deskOctober 26, 2026No Comments4 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    महाराष्ट्र नवनिर्माण सेना, जळगाव शहरच्या वतीने आज मा. सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन विभाग, जळगाव यांना निवेदन देण्यात आलं. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील हॉटेल्स, मिठाईची दुकाने, खाद्यपदार्थ विक्री केंद्रे, शीतगृहे, गोदामे व अन्नपदार्थ उत्पादन केंद्रांची विशेष तपासणी मोहीम राबवून भेसळयुक्त, निकृष्ट, मुदतबाह्य व अस्वच्छ अन्नपदार्थाविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी यात करण्यात आली आहे.

    महाराष्ट्र राज्य अन्न व औषध प्रशासनामार्फत सणासुदीच्या काळात नागरिकांना सुरक्षित, दर्जेदार व भेसळमुक्त अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत, या उद्देशाने ‘फेस्टिव्ह क्रॅकडाऊन’ या स्वरूपाची विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत अन्नपदार्थांची तपासणी, संशयित साठ्याची पडताळणी, नमुने संकलित करणे आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर कायदेशीर कारवाई करणे अशा उपाययोजना केल्या जात आहेत.

    दिवाळी हा मोठ्या प्रमाणावर मिठाई, मावा, खवा, खाद्यतेल, सुकामेवा, फराळाचे पदार्थ आणि इतर खाद्यपदार्थांची खरेदी-विक्री होणारा सण आहे. या काळात अन्नपदार्थांमध्ये भेसळ करणे, निकृष्ट दर्जाचे कच्चे साहित्य वापरणे, अनधिकृत खाद्यरंगाचा वापर करणे, मुदतबाह्य पदार्थांची विक्री करणे, तसेच अन्नपदार्थांची अयोग्य साठवणूक व अस्वच्छ वातावरणात निर्मिती होणे, अशा प्रकारांमुळे नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो.

    या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील शहरी तसेच ग्रामीण भागात अन्नसुरक्षा नियमांची प्रभावी अंमलबजावणी होणे अत्यंत आवश्यक आहे.

    मनसेच्या प्रमुख मागण्या :-

    १. विशेष तपासणी मोहीम तातडीने राबवावी :-
    जळगाव जिल्ह्यातील सर्व हॉटेल्स, मिठाईची दुकाने, बेकरी, फराळ विक्री केंद्रे, खाद्यपदार्थ विक्री केंद्रे, शीतगृहे, गोदामे, अन्नपदार्थ उत्पादन केंद्रे तसेच इतर संबंधित आस्थापनांची विशेष तपासणी करण्यात यावी. ही मोहीम शहरी आणि ग्रामीण भागात प्रभावीपणे राबविण्यात यावी.

    २. अन्नपदार्थांचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत तपासणी करावी :-
    मिठाई, मावा, खवा, खाद्यतेल, सुकामेवा, फराळाचे पदार्थ, दुग्धजन्य पदार्थ आणि इतर संवेदनशील खाद्यपदार्थांचे आवश्यकतेनुसार नमुने घेऊन अधिकृत प्रयोगशाळेत तपासणी करण्यात यावी. नमुन्यांमध्ये भेसळ किंवा निकृष्ट दर्जा आढळल्यास संबंधितांविरुद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई करावी.

    ३. स्वच्छता व साठवणुकीच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करावी :-
    हॉटेल्स, मिठाईची दुकाने आणि खाद्यपदार्थ उत्पादन केंद्रांमधील स्वयंपाकघराची स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता, सांडपाणी व्यवस्थापन, कच्च्या मालाची साठवणूक, अन्नपदार्थांचे तापमान व साठवणुकीची स्थिती, शाकाहारी व मांसाहारी पदार्थांची योग्य स्वतंत्र हाताळणी आणि खाद्यरंगांच्या वापराची तपासणी करावी. नियमांचे उल्लंघन आढळल्यास नियमानुसार दंडात्मक कारवाई करावी.

    ४. परवाने, नोंदणी, लेबलिंग व मुदतबाह्य पदार्थाची तपासणी करावी :-
    संबंधित आस्थापनांकडे आवश्यक अन्नसुरक्षा परवाने व नोंदणी आहेत की नाही, याची पडताळणी करावी. पॅकबंद खाद्यपदार्थांवरील उत्पादन दिनांक, वापरण्याची अंतिम मुदत, घटकांची माहिती, बॅच क्रमांक आणि इतर अनिवार्य लेबलिंग नियमांचे पालन होत आहे की नाही, याची तपासणी करावी. मुदतबाह्य किंवा नियमबाह्य पदार्थाची विक्री आढळल्यास कायद्यानुसार कारवाई करावी.

    ५. भेसळयुक्त, निकृष्ट व प्रतिबंधित अन्नपदार्थांच्या साठ्यावर कठोर कारवाई करावी :-
    भेसळयुक्त, निकृष्ट दर्जाचे, मुदतबाह्य किंवा नियमबाह्य अन्नपदार्थ आढळल्यास लागू कायदे व नियमांनुसार नमुने संकलित करणे, विक्रीवर निर्बंध घालणे, साठा जप्त करणे, परवाना निलंबित किंवा रद्द करण्याची कार्यवाही करणे आणि आवश्यकतेनुसार संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया राबवावी. प्रतिबंधित गुटखा, पानमसाला व सुगंधित तंबाखूच्या विक्री, साठवणूक व वितरणाविरोधातही संबंधित कायद्यांनुसार कठोर कारवाई करावी.

    ६. सात दिवसांच्या आत तपासणी मोहिमेचा प्रारंभ करून कार्यवाहीचा आढावा घ्यावा :-
    या निवेदनाच्या प्राप्तीपासून सात दिवसांच्या आत विशेष तपासणी मोहिमेचा प्रारंभ करून केलेल्या कार्यवाहीचा आढावा घ्यावा. तपासणी केलेल्या आस्थापनांची संख्या, संकलित केलेले नमुने, जप्त केलेला साठा, बजावलेल्या नोटिसा, करण्यात आलेली दंडात्मक कारवाई, परवाने निलंबित किंवा रद्द करण्यासंबंधीची कार्यवाही आणि दाखल केलेल्या प्रकरणांची माहिती कायदेशीर मर्यादांचे पालन करून अधिकृतरीत्या जनतेसमोर प्रसिद्ध करावी.

    ७. जबाबदार अधिकाऱ्यांची निश्चिती करून नियमित आढावा घ्यावा :-
    विशेष तपासणी मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी. प्राप्त तक्रारींची तातडीने दखल घेऊन त्यांची चौकशी करावी आणि योग्य ती कायदेशीर कार्यवाही करावी. मोहिमेच्या प्रगतीचा नियमित आढावा घेऊन निष्काळजीपणा आढळल्यास नियमानुसार कार्यवाही करावी.

    आंदोलनाचा इशारा :-
    उप महानगराध्यक्ष राजेंद्र निकम, दिला आंदोलनाचा इशारा, प्रशासनाकडून अपेक्षित कार्यवाही वरील मागण्यांची तातडीने दखल घेऊन जळगाव जिल्ह्यात विशेष तपासणी मोहीम राबविण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना द्यावेत. तसेच या मोहिमेतून नागरिकांना सुरक्षित, शुद्ध, दर्जेदार आणि भेसळमुक्त अन्नपदार्थ उपलब्ध होतील, यासाठी प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. अन्नसुरक्षा नियमांचे पालन करणाऱ्या व्यवसायिकांना कोणताही अनावश्यक त्रास न देता, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पुराव्यांच्या आधारे आणि कायद्यानुसार समान निकष लावून कारवाई करण्यात यावी.

    नागरिकांना सुरक्षित, शुद्ध आणि भेसळमुक्त अन्नपदार्थ उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची महत्त्वाची जबाबदारी आहे. त्यामुळे या निवेदनातील मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन निर्धारित कालावधीत ठोस कार्यवाही करावी. याप्रसंगी जळगाव अन्न औषधी प्रशासनाचे सह आयुक्त दीनानाथ शिंदे यांनी या निवेदनावर तात्काळ आम्ही कारवाई करू असे आश्वासन दिले,

    निवेदन प्राप्त झाल्यापासून सात दिवसांच्या आत विशेष तपासणी मोहिमेचा प्रारंभ करून त्याबाबतची कार्यवाही करण्यात आली नाही किंवा या गंभीर विषयाकडे दुर्लक्ष करण्यात आले, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना, जळगाव शहर यांच्या वतीने लोकशाही व सनदशीर मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. या परिस्थितीची प्रशासनाने गांभीर्याने नोंद घ्यावी.

    याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपमहा नगराध्यक्ष
    श्रीकृष्ण मेंगडे, राजेंद्र निकम, ललित शर्मा, प्रकाश जोशी, आशुतोष जाधव, शेतकरी सेनेचे तालुकाध्यक्ष प्रदीप पाटील, शाखाध्यक्ष युसुफ खाटीक, संजय मोती, राहुल चव्हाण, दीपक राठोड, खुशाल ठाकूर, यांच्यासह महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते..

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    दुष्काळात कामांची दिरंगाई खपवून घेणार नाही; अपूर्ण पाणीपुरवठा योजना महिनाभरात पूर्ण करा — पालकमंत्री गुलाबराव पाटील

    October 26, 2026

    जळगाव पुन्हा हादरले : कौटुंबिक वादातून २१ वर्षीय तरुणाचा जीव घेतला

    October 26, 2026

    जिल्हा बँकेच्या निवडणुकीत कार्यकारी संचालक देशमुख यांचा हस्तक्षेप?

    October 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.