
जळगाव : प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराज परिसरात कौटुंबिक वादातून झालेल्या धारदार शस्त्राच्या हल्ल्यात २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. सनी विनोद डोळे (वय २१, रा. शिवाजीनगर, जळगाव) असे मृत तरुणाचे नाव असून, या प्रकरणातील संशयित आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.शहर शोधा
मिळालेल्या माहितीनुसार, सनी डोळे आणि त्याच्या बहिणीचा पती सुरज नारायण वानखेडे (रा. कंडारी, ता. भुसावळ) यांच्यात कौटुंबिक कारणावरून वाद झाला होता. या वादाने गंभीर स्वरूप धारण केले. यावेळी सुरज वानखेडे याने सनीवर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात सनी गंभीर जखमी झाला. घटनेनंतर सनीला तातडीने जळगाव येथील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर त्याला मृत घोषित केले. अवघ्या २१व्या वर्षी सनीचा मृत्यू झाल्याने त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
या घटनेत सनीची आजी सुमनबाई तायडे यांच्या हातालाही दुखापत झाली आहे. नातवाच्या मृत्यूची बातमी समजताच त्याची आई आणि आजी यांनी रुग्णालयात केलेला आक्रोश पाहून उपस्थितांचे मन हेलावून गेले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने कारवाई करत संशयित सुरज वानखेडे याला अटक केली. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. कौटुंबिक वादातून घडलेल्या या जीवघेण्या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून, वादाचे पर्यवसान थेट जीवघेण्या हल्ल्यात झाल्याने पुन्हा एकदा शहरातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न चर्चेत आला आहे.



