
जळगाव : प्रतिनिधी
जेवण बनवून न दिल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून मुलाने आईवर हल्ला करून तिची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार बोदवड तालुक्यातील येवती येथे उघडकीस आला आहे. अलकाबाई पुरुषोत्तम वाघ (वय अंदाजे ६३) असे मृत महिलेचे नाव असून, त्यांचा मुलगा गणेश पुरुषोत्तम वाघ याच्याविरुद्ध बोदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवार, २५ ऑक्टोबर रोजी पहाटे ही घटना समोर आल्यानंतर गावात खळबळ उडाली.
पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, अलकाबाई वाघ या येवती येथे मुलगा गणेश याच्यासोबत राहत होत्या. त्यांचे पती पुरुषोत्तम वाघ यांचे सुमारे १५ वर्षांपूर्वी निधन झाले होते. गणेश याच्या दोन्ही पत्नी त्याच्यासोबत राहत नसल्याची माहितीही तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणातील फिर्यादी आकाश रविंद्र महाजन (वय २४) हे अलकाबाई यांचे नातू आहेत. ते जामनेर तालुक्यातील पाटखेडा येथे मेव्हण्याकडे राहून मजुरी करतात. २५ ऑक्टोबर रोजी पहाटे ५.०५ वाजता त्यांचा भाऊ अनिकेत याने फोन करून आजीची हत्या झाल्याची माहिती दिली. त्यानंतर आकाश महाजन हे मेव्हणे धर्मराज शशिकांत पाटील यांच्यासोबत येवती येथे पोहोचले.
पहाटे ५.३० वाजता घरी पोहोचल्यावर घरासमोर नागरिकांची गर्दी होती. घरात अलकाबाई रक्ताने माखलेल्या अवस्थेत जमिनीवर पडलेल्या दिसल्या. त्यांच्या अंगावर गोधडी टाकलेली होती, तर जवळच गणेश वाघ हातात खुरपे घेऊन बसलेला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. घटनास्थळी रक्ताचे डाग असलेली फुटलेली लोणच्याची बरणी आणि शेतीकामासाठी वापरले जाणारे लोखंडी अवजारही आढळल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. आकाश महाजन यांनी गणेश वाघ याला घटनेबाबत विचारणा केली असता, जेवण बनवून न दिल्याच्या रागातून आईच्या डोक्यात लोणच्याची बरणी मारून खुरप्याने वार केल्याचे त्याने सांगितल्याचा दावा तक्रारीत आहे. यानंतर आकाश महाजन यांनी बोदवड पोलिसांत तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा पुढील तपास बोदवड पोलीस करीत असून, घटनेची नेमकी पार्श्वभूमी तपासातून स्पष्ट होणार आहे.



