
पाचोरा : प्रतिनिधी
शहरातून भोजे येथे रेशनचे धान्य घेवून जाणारा ट्रक अचानक उलटला. या दुर्दैवी अपघातात ट्रकच्या मागे पोत्यांवर बसलेल्या हमालाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा येथून वरखेडी मार्गे भोजे येथे रेशनिंगचे धान्य घेवून जाणारा आयशर ट्रक (एमएच १९, १९४७) हा वळणावरील कठडे नसलेल्या नाल्यात उलटल्याची घटना गुरूवारी दुपारी २.३० वाजता घडली. या वेळी ट्रकमध्ये चालकासह तीन हमाल बसलेले होते. तर हमाल गहू आणि तांदुळाच्या कद्वयांवर बसलेले होते. या पैकी संभाजी केरप्पा बावचे (रा. गिरणा पंपिंग रोड, गोकुळधाम समोर, पाचोरा) यांचा गव्हाच्या गोण्यांखाली दबले गेल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. प्रत्यक्ष दर्शीच्या माहितीनुसार समोरून येणाऱ्या बसला वाचवण्याच्या प्रयत्नात हा आयशर ट्रक ऊलटल्याचे कळते.
अपघातातील मयत संभाजी बाचवे यांचे पाचोरा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. या संदर्भात पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. दरम्यान, दुपारी वरखेडीतील गुरुवारचा आठवडे बाजार असल्याने बाजारात कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना अपघाताची माहिती मिळताच वरखेडी बीटचे पो.कॉ. नामदेव इंगळे व अतुल पवार यांनी घटनास्थळी धाव घेत मदत केली.



