
चोपडा : प्रतिनिधी
चोपडा शहर पोलिसांनी विनापरवाना गावठी कट्टा आणि चार जिवंत काडतुसांसह गुजरातमधील एका २४ वर्षीय तरुणाला ताब्यात घेतले आहे. जयेश दिलीप पाटील (वय २४, रा. कपुदरा, सुरत, गुजरात) असे या तरुणाचे नाव असून, त्याच्याकडून कार, पाच मोबाईल फोन आणि चार सिमकार्ड असा एकूण ८ लाख ३० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४३०/२०२६ अन्वये शस्त्र अधिनियमाच्या कलम ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १९ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री सुमारे ८.१५ वाजण्याच्या सुमारास चोपडा शहरातील धनवाडी रोड परिसरातील ग्रामसेवक कॉलनी व शशिकांत नगर परिसरातील सार्वजनिक रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली. यावेळी आरोपी जयेश पाटील याच्या ताब्यातील मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर कारमध्ये विनापरवाना गावठी कट्टा (अग्निशस्त्र) आणि चार जिवंत काडतुसे आढळून आली. त्याचबरोबर पाच मोबाईल फोन आणि चार सिमकार्डही पोलिसांनी जप्त केले.
या कारवाईत पोलिसांनी सुमारे ७ लाख रुपये किमतीची पांढऱ्या रंगाची स्विफ्ट डिझायर कार, एक लाख रुपये किमतीचा गावठी कट्टा, चार हजार रुपये किमतीची चार जिवंत काडतुसे, तसेच विविध कंपन्यांचे पाच मोबाईल फोन जप्त केले. जप्त केलेल्या सर्व मुद्देमालाची एकूण किंमत ८ लाख ३० हजार रुपये असल्याची नोंद पोलिसांच्या माहितीत आहे. सदर आरोपीविरुद्ध गुजरातमध्ये ॲट्रॉसिटी, पॉक्सो, खुनाचा प्रयत्न (कलम ३०७), दरोडा यांसह विविध गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
ही कारवाई चोपडा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पवन देसले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक चेतन परदेशी हे या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत. विनापरवाना अग्निशस्त्र बाळगल्याप्रकरणी आरोपीविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू असून संशयित पोलिसांच्या ताब्यात आहे.



