
छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था
शहरातील एन-७ सिडको परिसरात भररस्त्यात घडलेल्या हत्येचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. व्यावसायिक स्पर्धेतून आणि अंतर्गत वैमनस्यातून एका २२ वर्षीय तरुणाने आपल्याच जवळच्या मित्राचा अत्यंत निर्घृणपणे काटा काढला आहे. आधी पाठीमागून भरधाव कारने जोरदार धडक दिली आणि त्यानंतर यू-टर्न घेत जखमी अवस्थेत तडफडणाऱ्या मित्राच्या डोक्यात लोखंडी रॉड आणि लाकडी दांड्याने सपासप वार करून त्याची जागीच हत्या केली. देवेश उर्फ बंटी चंद्रेश दीक्षित (वय ३६) असे मयत तरुणाचे नाव असून, पवन दिलीप पराशर (वय २२, रा. वानखेडेनगर) असे आरोपीचे नाव आहे. या थरारक हत्येनंतर आरोपी पवन स्वतः कार घेऊन सिडको पोलीस ठाण्यात हजर झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत देवेश उर्फ बंटी दीक्षित आणि आरोपी पवन पराशर यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून व्यावसायिक आणि पैशाच्या कारणावरून वाद धुमसत होता. घटनेच्या दिवशी सकाळी बंटी नेहमीप्रमाणे जिम आटोपून आपल्या दुचाकीवरून घरी जात होता. आरोपी पवन हा आधीपासूनच कारमध्ये दबा धरून त्याच्या हालचालींवर पाळत ठेवून होता.
बंटीची दुचाकी एन-७ सिडकोतील मंगेश गॅस एजन्सीसमोर पोहोचताच, पाठीमागून येणाऱ्या आरोपी पवनने कारचा वेग वाढवला आणि दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, बंटी हवेत उडून थेट रस्त्यावर कोसळला, तर त्याची दुचाकी तब्बल १५० फूट दूर असलेल्या विश्वास वाईन्स शॉपजवळ जाऊन आदळली. कारच्या धडकेने बंटी गंभीर जखमी अवस्थेत रस्त्यावर पडला होता. मात्र, आरोपीने गाडी न थांबवता पुढे जाऊन चौकातून अचानक यू-टर्न घेतला आणि कार पुन्हा जखमी बंटीच्या अंगाजवळ आणून थांबवली. कारमधून खाली उतरताना आरोपीने लाकडी दांडा आणि जाड लोखंडी रॉड काढला. रक्तबंबाळ अवस्थेत पडलेल्या बंटीच्या डोक्यात आणि चेहऱ्यावर त्याने अत्यंत क्रूरपणे एकापाठोपाठ एक घाव घातले. डोक्यात वर्मी घाव बसल्याने बंटी दीक्षितचा जागीच मृत्यू झाला.
भररस्त्यात हा थरार घडवून आणल्यानंतर, हल्लेखोर पवन पराशरने घटनास्थळावरून पळ काढला. मात्र, तो थेट कार घेऊन सिडको पोलीस ठाण्यात पोहोचला आणि पोलिसांसमोर स्वतःहून हजर झाला. भरदिवसा घडलेल्या या निर्घृण हत्याकांडामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, सिडको परिसरात प्रचंड दहशत पसरली आहे. या भयंकर खुनाने छ्त्रपती संभाजीनगर परिसरात भीतीचे वातावरण आहे. खुनाची माहिती मिळतातच पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले, पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर आणि अतुल येरमे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी या खुनाचा तपास सुरू केला आहे. चौकशीअंती खुनाचे नेमके कारण आणि मुख्य सूत्रधारही समोर येईल.



