
जळगाव : प्रतिनिधी
शेतीची नापीकी व घराचे कर्ज, त्यात दुष्काळी स्थितीमुळे हातचे पिक जात असल्याने ज्ञानेश्वर बाबुराव सपकाळे (वय ३५, रा. किनोद, ता. जळगाव) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवार दि. १३ ऑक्टोबर रोजी किनोद येथे घडली. याप्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
तालुक्यातील किनोद येथील शेतकरी ज्ञानेश्वर सपकाळे यांच्यावर सहकारी सोसायटीचे कर्ज आहे. तसेच शेतीसाठी उसनवारीने काही रक्कम घेतलेली असून घरासाठीदेखील गृहकर्ज देखील घेतलेले आहे, अशी माहिती किनोद येथील रहिवाशांनी दिली. शेतामध्ये कापसाची लागवड केली असून चांगले पिक आले की, कर्ज फेडू या विचारात ते होते. मात्र यंदा दुष्काळी स्थितीमुळे पिकही हातचे जात असल्याचे पाहून ते खचल्याने ते सतत चिंतेत राहत होते. मंगळवारी पत्नी शेतात गेलेली असताना त्यांनी राहत्या घरात गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली.
हा प्रकार आजूबाजूच्या रहिवाशांच्या लक्षात आल्यानंतर त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.



