
पुणे : वृत्तसंस्था
पिंपरी-चिंचवडमधील निगडी येथे मंदिराच्या गाभाऱ्यात दर्शनासाठी गेलेल्या एका १० वर्षीय चिमुरडीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या प्रकरणी निगडी पोलिसांनी विशाल सिंग (२५, रा. निगडी, मूळ रा. बिहार) या मेट्रो प्रकल्पावरील कंत्राटी कामगाराला तातडीने अटक केली आहे. या घटनेचे संपूर्ण चित्रण मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे.
पीडित मुलगी मंदिरात दर्शनासाठी गेली होती. गाभाऱ्यात कुणी नसल्याचा गैरफायदा घेत आरोपी विशाल सिंग याने तिच्याशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला. घाबरलेल्या बालिकेने तात्काळ घरी धाव घेत कुटुंबीयांना घडलेला प्रकार सांगितला. पालकांनी स्थानिक नागरिकांसह पोलिसांत धाव घेतल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीला अवघ्या काही तासांत अटक केली.
बीएनएस कलम ७४ आणि पोक्सोअंतर्गत कारवाई निगडी पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ७४ (महिलांच्या लज्जेचे रक्षण / विनयभंग) तसेच बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदामधील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपी कंत्राटी पद्धतीने मेट्रोच्या कामावर मजूर म्हणून कार्यरत होता.
पवित्र मंदिरातही आयाबहिणी असुरक्षित : विजय वडेट्टीवार
या घटनेवरून राज्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदार विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर तीव्र निशाणा साधला. “मंदिराच्या पवित्र गाभाऱ्यातही आयाबहिणी सुरक्षित नसतील तर राज्यात कायदा-सुव्यवस्था शिल्लक आहे का? महिला सुरक्षेच्या पोकळ गप्पा मारणाऱ्या सरकारच्या काळात गुन्हेगारांना कसलाही धाक उरलेला नाही. गृह खाते आणि पोलिस प्रशासनाने झोपेतून जागे होऊन या नराधमाला फाशीसारखी कठोर शिक्षा मिळवून द्यावी,’ अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी या वेळी केली.



