
भुसावळ : प्रतिनिधी
तालुक्यातील वरणगाव येथे उसनवार दिलेले साडेचार लाख रुपये आणि साडेतीन तोळे सोन्याची पोत परत मागितल्यावरून झालेल्या वादात तरुणाने मामेभावावर चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची घटना वरणगावातील मोठी होळी, शिवाजी चौक परिसरात ११ ऑक्टोबरला सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. या घटनेत शिवाजी चौकातील वर्धमान मधुकर सैतवाल (वय ४८) यांच्या उजव्या हाताच्या दंडाला चाकू लागल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी अभिजित संतोष जैन याच्याविरुद्ध तक्रार नोंदवण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वर्धमान सैतवाल हे कापड दुकानाचा व्यवसाय करतात. त्यांच्या फिर्यादीनुसार, त्यांचे मामेभाऊ संतोष हिरालाल जैन यांना आर्थिक अडचण असल्याने सुमारे दोन वर्षांपूर्वी त्यांनी चार लाख ५० हजार रुपये रोख आणि साडेतीन तोळे सोन्याची पोत त्यांना उसनवारीने दिली होती. मात्र, संतोष जैन हे गेल्या आठ महिन्यांपासून कुटुंबासह वरणगावातून निघून गेले होते. दरम्यान, ११ ऑक्टोबरला संतोष जैन, त्यांची पत्नी मनीषा जैन आणि मुलगा अभिजित जैन हे वरणगावात घरी आल्याची माहिती सैतवाल यांना मिळाली. त्यानुसार ते पैसे व सोन्याच्या पोतीची विचारणा करण्यासाठी त्यांच्या घरी गेले. या वेळी घरासमोर उभ्या असलेल्या अभिजित जैन याला आई-वडिलांना बाहेर बोलावण्यास सांगितले असता, त्याने शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. तसेच, आई-वडिलांना पोलीस ठाण्यात घेऊन जाण्याबाबत बोलणे झाल्यानंतर अभिजितने खिशातून चाकू काढून त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. स्वतःचा बचाव करताना चाकू उजव्या हाताच्या दंडाला लागल्याचे सैतवाल यांनी फिर्यादीत नमूद केले आहे.
घटनेनंतर गल्लीतील नागरिकांसह वर्षा पाटील, सुवर्णा कारचकर, शारदा वंजारी आणि ललिता पाटील यांच्यासह अन्य नागरिक घटनास्थळी जमले. संतोष जैन यांच्याकडे इतरही काही लोकांची हातउसनवारीची रक्कम असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. या प्रकरणी वर्धमान सैतवाल यांनी वरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन अभिजित जैन याच्याविरुद्ध फिर्याद दिली आहे.



