
पाचोरा : प्रतिनिधी
तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची नाकाबंदी दरम्यान कारवाई करत इनोव्हा वाहनासह १५ लाख ३३ हजार ६०० रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखूचा साठा जप्त केला.
मिळालेल्या माहितीनुसार, पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत १२ रोजी पोलीस पथक नाकाबंदी करत होते. या वेळी इनोव्हा कार (एमएच १८, एजे- ६५२५) ही पहूर येथून चाळीसगावच्या दिशेने जात असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. हे वाहन थांबवण्याचा पो.ना. दीपक पाटील, पो.कॉ. विकी इंगळे व पो.कॉ. मनोज महाजन यांनी प्रयत्न केला. परंतु, वाहनचालकाने वाहन न थांबवता पुढे जाण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी वाहन थांबवून त्याची तपासणी केली असता, वाहनामध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित केसरयुक्त विमल पानमसाला व व्ही-१ सुगंधित तंबाखूचा साठा आढळून आला. या गाडीचा चालक हा चाळीसगावातील माऊली नगरमधील आबा विठ्ठल पाटील (वय ५४) हा असल्याचे स्पष्ट झाले आहे. यानंतर घटनेची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आली.
तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून जप्त केलेल्या प्रतिबंधित पदार्थांबाबत माहिती देण्यात आली. यानंतर अन्न सुरक्षा अधिकारी किशोर बाविस्कर हे पोलीस ठाण्यात हजर झाले. त्यांनी सरकारतर्फे फिर्याद दिल्याने पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात या संदर्भात वेगवेगळ्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक राजू सांगळे करत आहेत. या कारवाई पोलिसांनी केसरयुक्त विमल पानमसाला व व्ही-१ सुगंधित तंबाखूचा साठा तसेच इनोव्हा वाहन असा एकूण १५ लाख ३३ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम यांच्या मार्गदर्शनात पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्याच्या स.पो. नि. कल्याणी वर्मा यांच्यासह पो.ना. दीपक पाटील, पो.कॉ. विकी इंगळे, पो.कॉ. शाम हटकर व पो.कॉ. मनोज महाजन यांनी केली.



