
जळगाव : प्रतिनिधी
वीज मोटारची वायर पुन्हा जोडताना विजेचा धक्का लागून चिन्मय मंगेश सपकाळे (वय १४, मूळ रा. गलंगी, ता. चोपडा) या वारकरी संप्रदायाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (९ ऑक्टोबर) सावखेडा शिवारातील राधाकृष्ण वारकरी संस्थेत घडली. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सावखेडा शिवारातील राधाकृष्ण वारकरी संस्थेत विविध भागातील विद्यार्थी शिक्षण घेत असून तेथेच राहतात. त्यांच्यातीलच चिन्मय सपकाळे हा दोन वर्षापासून या ठिकाणी वारकरी शिक्षण घेत होता. शुक्रवारी सकाळी परिसरात बोरिंगची मोटार सुरू होती. तेथून चिन्मय जात असताना त्याचा पाय वायरमध्ये अडकला व ती निघाली. ही वायर पुन्हा जोडत असताना चिन्मयला विजेचा जोरदार धक्का बसला. त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच शासकीय वैद्यकीय नातेवाईक महाविद्यालय व रुग्णालयात पोहोचले. चिन्मयच्या पश्चात वडील, दोन मोठ्या बहिणी असा परिवार आहे. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोहेकॉ. धनराज पाटील करत आहेत.



