
जळगाव : प्रतिनिधी
इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर कपड्यांची ऑनलाईन ऑर्डर दिलेल्या प्रीती मुकेश बांगड (वय ४१, रा. १८, सरजू निवास, महावीर नगर) कपड्यांची डिलिव्हरी देण्याच्या बहाण्याने महिलेच्या बँक खात्यातून तब्बल ८७ हजार २१९ रुपयांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक केली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील महावीर नगरात राहणाऱ्या प्रीती मुकेश बांगड यांनी दि. २४ सप्टेंबर ते दि. २७ सप्टेंबर या दरम्यान इन्स्टाग्रामवरील ‘लक्ष्मी कलेक्शन’ (गौरव पाथ रोड, शाखी नगर, जोधपूर राजस्थान) या पेजवरून कपड्यांची ऑर्डर दिली होती. यानंतर संशयितांनी ग्लोबल डिलिव्हरी डिपार्टमेंटच्या नावाने त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर वेळोवेळी प्रीती बांगड यांच्या व्हाट्सअॅपवर कॉल करून कपड्यांचे पेमेंट व डिलिव्हरीसाठी वेगवेगळे क्यूआर कोड आणि काही पेमेंट लिंक्स पाठवल्या. तसेच फसवणूक करणाऱ्यांनी त्यांना त्या लिंक उघडून विशिष्ट कोड नंबर टाकण्यास सांगितले.
याप्रकरणी प्रिती बांगड यांनी दिलेल्या तक्रारीवरून दि. ७ऑक्टोबर रोजी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सागर शिंपी हे करत आहेत.



