
भुसावळ : प्रतिनिधी
शहरातील साक्री फाटा परिसरात २९ लाख रुपयांच्या पैशांच्या व्यवहारातून २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भूषण उल्हास व्हावले असे मृत तरुणाचे नाव आहे. पैशांच्या वादातून त्याला फार्म हाऊसवर मारहाण करून गंभीर जखमी करण्यात आले आणि त्यानंतर राष्ट्रीय महामार्गालगत टाकून देण्यात आल्याचा आरोप मयताच्या भावाने दिलेल्या फिर्यादीत करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोन संशवितांना ताब्यात घेतले असून तिसऱ्या संशयिताचा शोध सुरू आहे.
भुसावळ शहरालगत वरणगाव महामार्गावरील एका वॉटर पार्कसमोर २१ वर्षीय तरुणाचा मृतदेह गुरुवारी सकाळी आढळला. भूषण उल्हास व्हावले (वय २१, रा. गांधीनगर, भुसावळ) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी भाजपचे नगरसेवक राजेंद्र आवटे यांचा भाऊ संजय उर्फ संजू आवटे, प्रमोद बलराम लावरिया या दोघांना ताब्यात घेत अटक केली. पोलिसांकडे भूषणचा भाऊ विशाल उल्हास व्हावले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ७ ऑक्टोबर रोजी दुपारी एका व्यक्तीचा फोन आल्यानंतर भूषण घराबाहेर पडला त्याच्यासोबत त्याची आईही गेली होती. सायंकाळच्या सुमारास साक्री फाटा परिसरातील संजय आवटे यांच्या फार्म हाऊसवर कुटुंबीय पोहोचले असता भूषण तेथे बसलेला दिसला. यावेळी संजय आवटे यांच्यासह आणखी दोन व्यक्ती तेथे उपस्थित असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. फिर्यादीतील माहितीनुसार, संजय आवटे यांनी भूषणकडून ३४ लाख रुपये घेतले होते. त्यापैकी ५ लाख रुपये परत करण्यात आले असून तब्बल २९ लाख रुपये बाकी असल्याचे सांगण्यात आले. उर्वरित रक्कम आणून देण्याचे आश्वासन देऊनही भूषणला तेथून सोडण्यात आले नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
दरम्यान, रात्री भूषणने कुटुंबीयांशी फोनवर संपर्क साधून पैशांची व्यवस्था झाली का, अशी विचारणा केली होती. त्यानंतर मात्र त्याचा फोन संपर्कात आला नाही. त्यामुळे कुटुंबीयांची चिंता वाढली. ८ ऑक्टोबर रोजी सकाळी भूषणचा मृतदेह अलीशान वॉटर पार्कसमोरील पुलाजवळ, राष्ट्रीय महामार्गालगत सर्व्हिस रोडवर आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन ट्रॉमा केअर सेंटरमध्ये पाठवला. तेथे कुटुंबीयांनी मृतदेहाची ओळख पटवली.
भूषणच्या उजव्या डोळ्याखाली जखम, उजव्या कानातून रक्तस्राव तसेच हात व पाठीवर खरचटल्याच्या आणि काळेनिळे डाग असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या जखमांमुळे त्याला मारहाण करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे



