
जळगाव : प्रतिनिधी
कारमध्ये नग्रअवस्थेत बसलेल्या महाराजाने डोक्यावर हात फिरवून रामचंद्र गंभीर बेडीस्कर (वय ६३, रा. जाकीर हुसेन कॉलनी) यांच्या बोटातून ७ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी हातचालाखी करीत लांबविली. ही घटना दि. ६ ऑक्टोंबर रोजी सकाळी पावणेसात वाजता जाकीर हुसेन कॉलनीत घडली. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील जाकीर हुसेन कॉलनीतील रामचंद्र बेडीस्कर हे सेवानिवृत्त असून ते नेहमीप्रमाणे दि. ६ ऑक्टोंबर रोजी सकाळी पावणेसात वाजता मॉर्निंग वॉक करीत होते. दरम्यान, पांढऱ्या रंगाची विना क्रमांकाची कार गाडगेबाबा चौकाकडून मोहाडी रोडकडे येत बेडीस्कर यांच्याजवळ थांबली. कारचालकाने वृद्ध बेडीस्कर यांना बोलावून घेत कारमध्ये महाराज बसलेले असून तुम्ही दर्शन घ्या आणि आम्हाला पत्ता सांगा असे म्हणाला. त्यानुसार बेडीस्कर हे महाराजांजवळ गेल्यानंतर ते नम्र अवस्थेत बसलेले होते. नग्न महाराजने वृद्ध बेडीस्कर यांच्या डोक्यावरुन हात फिरवित त्यांचा हातात हात घेतला. त्यानंतर विचारलेला पत्ता सांगितल्यानंतर ते कार घेवून निघून गेले. कार थोड्या अंतरावर गेल्यानंतर बेडीस्कर यांना बोटात अंगठी दिसून न आल्याने हातचालाखी करीत त्यांच्या बोटातील अंगठी लंपास केल्याचे समजले. त्यांनी आरडाओरड करीत कारच्या मागे धावले. मात्र तो पर्यंत कार चालकाने कार जोरात नेत तेथून पसार झाले. याप्रकरणी रामानंद नगर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महिनाभरापूर्वी गिरणा पंपींग रोड परिसरात कारमधून आलेल्यांनी मॉर्निंग वॉक करणाऱ्या ६८ वर्षीय वृद्धाला हरिद्वारचे सिद्ध साधू असल्याचे सांगत त्यांच्या हातातून सोन्याची अंगठी चोरुन नेल्याची घटना घडली होती. दरम्यान, मंगळवारी घडलेल्या घटनेत साम्य असल्याने दोन्ही घटनांमधील संशयित हे एकच असल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून त्यानुसार चोरट्यांचा शोध सुरु आहे



