
यावल l प्रतिनिधी
शेळगाव बॅरेजमध्ये यंदा पूर्ण क्षमतेने पाणीसाठा करण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू झाली आहे. आमदार अमोल जावळे यांनी तापी पाटबंधारे विकास महामंडळास पत्र देऊन शेळगाव बॅरेजमध्ये यावर्षी पूर्ण क्षमतेने पाणीसाठा करण्याची सूचना केली होती. या पत्राची दखल घेत जळगाव मध्यम प्रकल्प विभाग क्रमांक २, जळगाव या विभागाने त्यानुसार कार्यवाहीस सुरुवात केली आहे.
शेळगाव बॅरेज पूर्ण झाल्यानंतर मागील सुमारे पाच वर्षांच्या कालावधीत विविध कारणांमुळे त्यामध्ये पूर्ण क्षमतेने पाणीसाठा करण्यात आलेला नव्हता. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना अपेक्षित प्रमाणात उपसा सिंचनाचा लाभ मिळत नव्हता, तसेच त्याचा परिणाम परिसरातील भूजलपातळीवरही होत होता.
यंदा भविष्यातील पाणीटंचाईची शक्यता लक्षात घेऊन उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करावे आणि शेळगाव बॅरेजमध्ये १०० टक्के क्षमतेने पाणीसाठा करावा, अशी मागणी आमदार जावळे यांनी आपल्या पत्राद्वारे केली होती. पूर्ण क्षमतेने पाणीसाठा झाल्यास नदीकाठच्या शेतकऱ्यांना उपसा सिंचनासाठी मोठा आधार मिळणार असून परिसरातील भूजल पुनर्भरणालाही चालना मिळण्याची शक्यता आहे.
दरम्यान, आजमितीस शेळगाव बॅरेज जलाशयाची पाणीपातळी १७७ मीटरवर पोहोचली आहे. आगामी काळात पाणीपातळीत आणखी एक ते दोन मीटरने वाढ होण्याची शक्यता असल्याने यंदा शेळगाव बॅरेजमध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठा निर्माण होण्याची स्थिती आहे. त्यामुळे बॅरेजचा जलाशय विस्तीर्ण जलसाठ्याने भरून जाणार असून, त्याचा लाभ परिसरातील शेतीसह भूजल पातळी वाढीस होणार आहे.
आमदार अमोल जावळे यांनी तापी पाटबंधारे विकास महामंडळाला दिलेल्या पत्रात याबाबत आवश्यक कार्यवाही करून संबंधित अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना देण्याची मागणी केली होती. त्यानंतर संबंधित विभागाकडून प्रत्यक्ष कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
यामुळे यंदा शेळगाव बॅरेज पूर्ण क्षमतेने भरण्याच्या हालचालींना वेग आला असून, तापी नदीकाठच्या शेतकऱ्यांसाठी हा पाणीसाठा सिंचन व पर्यावरणाच्या दृष्टीने दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे.



