
नांदेड : वृत्तसंस्था
राज्यातील नांदेड शहरातून एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. पती आणि दोन मुलांच्या मृत्यूनंतर मानसिक धक्क्यात असलेल्या शिक्षिकेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना नांदेड शहरातील सांगवी भागातील गोपाळनगर येथे घडली. धम्मशिला मोरे असे मृत शिक्षिकेचे नाव आहे. २६ सप्टेंबर रोजी त्यांच्या प्रकृतीची गंभीर अवस्था झाल्यानंतर रुग्णालयात उपचार सुरू होते. सोमवारी, २८ सप्टेंबर रोजी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, भोकर तालुक्यातील बेंबर येथील मूळ रहिवासी असलेले सुनील मोरे हे जिल्हा परिषद शाळेत शिक्षक होते. त्यांच्या पत्नी धम्मशिला मोरे यादेखील शिक्षिका होत्या. १७ जुलै रोजी सुनील मोरे यांनी त्यांच्या दोन मुलांसह कार गोदावरी नदीपात्रात नेल्याची घटना घडली होती. या घटनेत सुनील मोरे यांच्यासह मुलगा सुमित आणि मुलगी सारा यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणाच्या तपासात मुलांचा मृत्यू झाल्यानंतर सुनील मोरे यांनी आत्महत्या केल्याचे पोलिस तपासात समोर आल्याचे सांगण्यात आले होते. या घटनेनंतर धम्मशिला मोरे कुटुंबातील जवळच्या व्यक्तींच्या मृत्यूमुळे मोठ्या दुःखातून जात होत्या.
दरम्यान, २६ सप्टेंबर रोजी दुपारी गोपाळनगर येथील राहत्या फ्लॅटमध्ये धम्मशिला मोरे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान २८ सप्टेंबर रोजी त्यांचा मृत्यू झाला. १७ जुलै रोजी पती आणि दोन मुलांच्या मृत्यूची घटना घडल्यानंतर अवघ्या काही महिन्यांत धम्मशिला मोरे यांचाही मृत्यू झाला. त्यामुळे तीन महिन्यांच्या कालावधीत एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.



