
चोपडा : प्रतिनिधी
सततची नापिकी, पावसाचा अभाव आणि शेतमालाला मिळणारा अत्यल्प भाव यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या अडावद ता.चोपडा येथील ३६ वर्षीय शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना १८ सप्टेंबर रोजी घडली. विजय ऊर्फ बंटी प्रताप माळी (वय ३६, रा. वरचा माळी वाडा, अडावद) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेमुळे अडावदसह चोपडा तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.विजय माळी हे आपल्या मालकीच्या चार बिघे शेतीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. गतवर्षी त्यांनी मूग, उडीद आणि कांद्याची लागवड केली होती. मात्र, कांद्याला काढणीच्या वेळी अत्यल्प भाव मिळाल्याने उत्पादन खर्चही भरून निघाला नाही. या आर्थिक संकटातून सावरण्याच्या प्रयत्नात त्यांनी यंदा हातउसवारी तसेच क्रेडिट कार्डच्या माध्यमातून कर्ज घेऊन मका पिकाची लागवड केली.
मात्र, यंदाही पावसाने साथ न दिल्याने त्यांच्या आशेवर पाणी फेरले. पावसाअभावी मका पीक पूर्णपणे करपून गेले. त्यानंतर कांदा लागवडीसाठी टाकलेले बियाणे व रोपेही पुरेशा पाण्याअभावी नष्ट झाली. त्यामुळे शेतीतून उत्पन्न मिळण्याची शक्यता मावळली आणि कर्जाचा भार वाढत गेला.सततच्या नापिकीमुळे डोक्यावर वाढलेले कर्ज कसे फेडायचे आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, या चिंतेत विजय माळी गेल्या काही दिवसांपासून होते. अखेर १८ सप्टेंबर रोजी त्यांनी शेतात आत्महत्या केली. ही बाब निदर्शनास आल्यानंतर त्यांना तातडीने चोपडा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश पाटील यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी डॉ. सुरेश पाटील यांच्या खबरीवरून चोपडा शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
कुटुंबावर दुःखाचा डोंगर
विजय माळी यांच्यावर १९ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता अडावद येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी तसेच वृद्ध आई-वडील असा परिवार आहे. कुटुंबाचा कर्ता पुरुष अचानक गेल्याने माळी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.शेतमालाला मिळणारा कमी भाव, पावसाची अनिश्चितता आणि वाढता कर्जबोजा या संकटांच्या कचाट्यात सापडलेल्या तरुण शेतकऱ्याच्या मृत्यूमुळे परिसरातील शेतकरी वर्गातून हळहळ व्यक्त होत आहे.



