
जळगाव | प्रतिनिधी :
मेहुणबारे पोलीस ठाणे हद्दीतील लोंबे गावातील शेंद्रे बाबा यांच्या यात्रेदरम्यान महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेणाऱ्या टोळीचा मेहुणबारे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईत तीन पुरुष व दोन महिला आरोपींना अटक, तर एका विधिसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईत सुमारे ८ लाख १६ हजार ८८२ रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी सुमारे ४ वाजता लोंबे गावातील शेंद्रे बाबा यांच्या यात्रेत फिरत असताना एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्यांनी लंपास केले होते. याप्रकरणी मेहुणबारे पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम ३०४(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन जळगावचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी तपासासाठी मार्गदर्शन केले. पोलीस उपअधीक्षक सह्याद्री बिर्ले यांच्या देखरेखीखाली मेहुणबारे पोलिसांनी तपासाला सुरुवात केली.
तपास पथकाने गोपनीय माहिती संकलित करून संशयित वाहनाचा शोध सुरू केला. पोलिसांच्या निदर्शनास आलेले वाहन एमएच-१६-एटी-६६८४ क्रमांकाचे असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याचा शोध घेण्यात आला. जामदा फाटा येथे नाकाबंदी करण्यात आली. नाकाबंदी दरम्यान संशयित वाहन पोलिसांना दिसले. पोलिसांनी वाहन थांबविण्याचा इशारा केला असता चालकाने वाहन न थांबवता जामदा फाट्याच्या दिशेने वेगाने पळ काढला. त्यानंतर पोलिसांनी पाठलाग सुरू केला.
पोलिसांचा पाठलाग सुरू असताना राहिपुरी गावाबाहेर बोऱ्हेड्याकडे जाणाऱ्या वळण रस्त्यावर संशयित वाहन रस्त्याच्या कडेला असलेल्या अर्धवट सिमेंटच्या पोलमध्ये अडकले. पोलिस पथकाने नागरिकांच्या मदतीने वाहनातील संशयितांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांनी गुन्ह्यात सहभाग असल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी या प्रकरणात सतिष तुकाराम चव्हाण (वय २१), ओम तुकाराम चव्हाण (वय १९) आणि कुणाल सरनेरसिंग चव्हाण (वय १९) यांना अटक केली. यानंतर आरोपींसोबत असलेल्या महिला साथीदारांचा शोध घेण्यात आला. राहुरी परिसरातून मोनिका तुकाराम चव्हाण (वय २३) आणि सुषमा राकेश भोसले (वय १९) यांना ताब्यात घेण्यात आले. तसेच एका विधिसंघर्षग्रस्त बालकालाही पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी केलेल्या कारवाईत २४.२६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, त्यामध्ये मंगळसूत्रातील सोन्याच्या वाट्या व सोन्याचे मणी, तीन मोबाईल फोन तसेच पांढऱ्या रंगाची मारुती डिझायर कार (एमएच-१६-एटी-६६८४) असा मुद्देमाल जप्त केला आहे. चौकशीदरम्यान आरोपींनी चाळीसगाव, नांदगाव बसस्थानक तसेच नाशिक शहरातील सीबीएस बसस्थानक परिसरात महिलांच्या गळ्यातील मणी व मंगळसूत्र चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. या गुन्ह्यांबाबतही पुढील तपास सुरू आहे.
या टोळीने यापूर्वी अशाच प्रकारचे आणखी गुन्हे केले आहेत का, तसेच या गुन्ह्यांमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा मेहुणबारे पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक मखाते, चाळीसगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. मेहुणबारे पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली.



