
जळगाव : प्रतिनिधी
जिल्ह्यातील विविध ठिकाणी जिओ टॉवरच्या जनरेटरमधून डिझेल चोरी करणाऱ्या संशयिताचा स्थानिक गुन्हे शाखेने शोध घेत चार गुन्ह्यांची उकल केली आहे. या कारवाईत ६५ लिटर डिझेल तसेच ५० हजार रुपये रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. या प्रकरणातील संशयित समीर जानमोहम्मद तडवी (वय ३०, रा. अकलूद, ता. यावल, जि. जळगाव) याचा सहभाग समोर आला असून, त्याच्याविरुद्ध पुढील तपास सुरू आहे.
जिओ टॉवरच्या जनरेटरमधून विविध ठिकाणी डिझेल चोरी होत असल्याच्या घटना पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी या गुन्ह्यांचा तपास करून आरोपींचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकरवाड यांनी स्वतंत्र पथक तयार करून जळगाव जिल्ह्यातील विविध ठिकाणी असलेल्या जिओ टॉवरच्या जनरेटरची माहिती तसेच यापूर्वी काम केलेल्या व्यक्तींची माहिती संकलित करण्याच्या सूचना दिल्या.
तपासादरम्यान पथकाला नाशिराबाद पोलीस स्टेशन हद्दीतील जिओ टॉवरवर पूर्वी काम केलेल्या व्यक्तींची माहिती मिळाली. त्यामध्ये समीर जानमोहम्मद तडवी याचे नाव समोर आले. त्याच्यावर पोलिसांचा संशय बळावल्याने पथकाने त्याचा शोध घेतला. तो अकलूद, ता. यावल येथे मिळून आल्यानंतर त्याची चौकशी करण्यात आली.
चौकशीदरम्यान पोलिसांनी जिओ टॉवरच्या जनरेटरमधून डिझेल चोरीबाबत विचारणा केली असता त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिल्याचे प्रेस नोटमध्ये नमूद आहे. मात्र, अधिक चौकशी केल्यानंतर त्याने जळगाव तालुक्यातील विविध ठिकाणी असलेल्या जिओ टॉवरच्या जनरेटरमधून डिझेल चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार संशयिताने खालील ठिकाणच्या जिओ टॉवरच्या जनरेटरमधून डिझेल चोरी केल्याचे तपासात समोर आले आहे : खिर्डी शिवार येथील जिओ टॉवर – २३० लिटर कडगाव रसयाणवाडी येथील जिओ टॉवर – २३० लिटर पाळधी रोडवरील जिओ टॉवर – २३० लिटर असोडा रोडवरील जिओ टॉवर – २४० लिटर अशा प्रकारे या चार घटनांमध्ये एकूण ९३० लिटर डिझेल चोरी झाल्याचे प्रेस नोटमधील तपशीलावरून नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणात नाशिराबाद पोलीस स्टेशनमध्ये चार स्वतंत्र गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. हे गुन्हे भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम ३०३(२) अन्वये दाखल करण्यात आले आहेत. चोरीच्या मुद्देमालापैकी ६५ लिटर डिझेल आणि ५० हजार रुपये रोख संशयिताकडून हस्तगत करण्यात आले असून, या प्रकरणाचा पुढील तपास नाशिराबाद पोलीस स्टेशनकडून सुरू आहे.
या कारवाईमुळे जिओ टॉवरच्या जनरेटरमधून होणाऱ्या डिझेल चोरीच्या घटनांना आळा घालण्याच्या दृष्टीने पोलिसांना महत्त्वाचे यश मिळाले आहे. जिल्ह्यात कोणत्याही ठिकाणी संशयास्पद हालचाल, चोरी अथवा इतर बेकायदेशीर प्रकार निदर्शनास आल्यास नागरिकांनी तात्काळ जळगाव पोलिसांच्या हेल्पलाइन अथवा डायल ११२ वर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. या कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.



