
धरणगाव : प्रतिनिधी
धरणगाव नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी रूपालीताई पवन महाजन देवरे यांची ११ सप्टेंबर रोजी बिनविरोध निवड झाली. निवडीनंतर रूपाली महाजन यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या निवासस्थानी भेट घेत त्यांचे शुभाशीर्वाद घेतले.
यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी रूपाली महाजन यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आणि उपनगराध्यक्षपदाच्या नव्या जबाबदारीसाठी शुभेच्छा दिल्या.
“आता धरणगाव शहरातील गोरगरीब आणि तळागाळातील नागरिकांची कामे प्राधान्याने करायची आहेत,” असा महत्त्वाचा सल्ला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी दिला. नागरिकांच्या अडचणी समजून घेत शहराच्या विकासाला गती देण्यासाठी सकारात्मक पद्धतीने काम करण्याचे मार्गदर्शन त्यांनी केले. पालकमंत्र्यांच्या या मार्गदर्शनामुळे धरणगावच्या विकासकामांना आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांना नव्या उपनगराध्यक्षांच्या माध्यमातून अधिक प्राधान्य मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
रूपाली महाजन यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आभार मानत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली धरणगाव शहरासाठी प्रामाणिकपणे काम करण्याचा विश्वास व्यक्त केला. रूपाली महाजन या शिवसेनेचे माजी उपनगराध्यक्ष तसेच श्री व्यायाम प्रसारक मंडळाचे संचालक आणि माळी समाजाचे पदाधिकारी देविदास बापू महाजन यांच्या सुनबाई असून, उद्योगपती पवन महाजन यांच्या धर्मपत्नी आहेत.
पालकमंत्र्यांच्या शुभेच्छा अन् विकासाचा संदेश
रूपाली महाजन यांच्या बिनविरोध निवडीने त्यांच्यावर शहराच्या विकासाची महत्त्वपूर्ण जबाबदारी आली असून, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनामुळे आगामी काळात धरणगाव शहरातील विकासकामे आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना अधिक प्रभावीपणे हाताळले जाण्याची अपेक्षा आहे



