
पारोळा : प्रतिनिधी
तालुक्यातील खेडीढोक येथे भरदिवसा बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोख रकमेसह सोन्याचे दागिने असा तब्बल २ लाख ५७ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. शनिवारी दि. ५ रोजी सकाळी ११ ते सायंकाळी साडेपाच वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. भरदिवसा घरफोडी झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खेडीढोक येथील शेतकरी सुपडू नारायण पाटील हे पत्नीसमवेत शनिवारी सकाळी सुमारे ११ वाजता घराला कुलूप लावून चिखलोड शिवारातील आपल्या शेतात शेतीच्या कामासाठी गेले होते. घर बंद असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरट्याने घरातील स्वयंपाकघरात ठेवलेल्या स्टीलच्या डब्यातील ५० हजार रुपये रोख रक्कम तसेच अॅल्युमिनियमच्या डब्यात ठेवलेले २३ ग्रॅम सोन्याचे दागिने असा एकूण २ लाख ५७ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.
दरम्यान, शेतातील काम आटोपून सुपडू पाटील व त्यांची पत्नी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घरी परतले. त्यावेळी घराच्या दरवाजाचे कुलूप उघडे असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. घरात प्रवेश करून पाहणी केली असता स्वयंपाकघरातील डब्यांमध्ये ठेवलेली रोकड व सोन्याचे दागिने गायब असल्याचे आढळून आले. घरफोडी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तत्काळ पारोळा पोलिसांशी संपर्क साधला.
याप्रकरणी सुपडू पाटील यांनी पारोळा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश महाजन यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच अमळनेर येथील फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळ पाहणी करून आवश्यक पुरावे संकलित केले. पोलिसांन घटनास्थळाचा पंचनामा केला असून, अज्ञात चोरट्याच्च शोध सुरू केला आहे. भरदिवसा घरफोडी झाल्या खेडीढोक परिसरातील नागरिकांमध्ये चिंता वाढली असून पोलिसांनी चोरट्यांचा तातडीने शोध घेऊन त्यांच्यावर कठ कारवाई करावी, अशी मागणी होत आहे



