
जळगाव : प्रतिनिधी
रस्त्याने बस घेऊन जात असताना एका विना क्रमांकाच्या दुचाकीस्वाराने बस चालकाला अश्लील शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या बस चालकाने बसमधील प्रवाशांसह थेट जिल्हापेठ पोलीस ठाणे गाठले. तेथे पोलिसांसमोर घडलेला प्रकार सांगत दुचाकीस्वारावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. पोलिसांनी संबंधित दुचाकीस्वाराचा शोध घेऊन कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर चालक बस घेऊन पुढील मार्गाला रवाना झाला. मंगळवारी (दि. २ सप्टेंबर) सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव आगाराची एमएच २०, बीएल २४८५ क्रमांकाची बस मंगळवारी खेडी-कढोलीकडून प्रवाशांना घेऊन नवीन बसस्थानकाच्या दिशेने येत होती. बस मानराज पार्क ते शिवकॉलनी दरम्यान आली असता एका विना क्रमांकाच्या दुचाकीवरून जाणाऱ्या व्यक्तीने बस चालकाला अश्लील शिवीगाळ केल्याचे सांगण्यात आले. अचानक झालेल्या या प्रकारामुळे बस चालक संतप्त झाला. मात्र रस्त्यावर वाद न घालता त्याने बसमधील प्रवाशांसह थेट जिल्हापेठ पोलीस ठाणे गाठण्याचा निर्णय घेतला. बस पोलीस ठाण्याच्या आवारात आणल्यानंतर चालकाने प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल वाघ यांच्यासमोर घडलेला प्रकार सांगितला.
यावेळी पोलिसांनी संबंधित दुचाकीस्वाराचा शोध घेऊन त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले. तसेच बस चालकाला याबाबत तक्रार देण्यास सांगण्यात आले. मात्र चालकाने लेखी तक्रार देण्यास नकार दिला. त्यानंतर काही वेळाने चालक बस घेऊन तेथून मार्गस्थ झाला. दरम्यान, सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या बस चालकासोबत रस्त्यावर अशा प्रकारे गैरवर्तन झाल्याने प्रवाशांमध्येही काही काळ चर्चा रंगली. या घटनेनंतर पोलिसांकडून संबंधित दुचाकीस्वाराचा शोध घेऊन त्याच्यावर कारवाई केली जाते का, याकडे लक्ष लागले आहे.



