
भुसावळ : प्रतिनिधी
घरगुती वादातून सुरू झालेला छळ सहन न झाल्याने ३० वर्षीय विवाहितेने भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेतली. पतीसह सासरच्या चौघांकडून शारीरिक व मानसिक छळ करण्यात आल्याचा आरोप महिलेने केला असून, या प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला मूळ मलकापूर (जि. बुलढाणा) येथील असून सध्या भुसावळ शहरातील जाम मोहल्ला परिसरात वास्तव्यास आहे. तिचा विवाह – ५ एप्रिल २०१५ रोजी मलकापूर – येथील सैय्यद समीर उर्फ बबलू न उर्फ शाका डॉन याच्यासोबत मुस्लिम रितीरिवाजानुसार झाला. या दाम्पत्याला चार अपत्ये आहेत. फिर्यादीत नमूद केल्यानुसार, विवाहानंतर सुरुवातीची दोन वर्षे संसार सुरळीत सुरू होता. त्यानंतर – मात्र पती व सासरच्या मंडळींकडून किरकोळ कारणांवरून टोमणे, शिवीगाळ आणि दमदाटी सुरू झाली. पतीला दारूचे व्यसन असून तो नशेत घरी येऊन मारहाण करतो, अश्लील शिवीगाळ करतो तसेच जीवे ठार मारण्याच्या धमक्या देतो, असा आरोप महिलेने केला आहे. सासू, आजेसासू आणि दीर या प्रकाराला विरोध करत नसल्याचेही फिर्यादीत नमूद आहे.
दरम्यान, १२ एप्रिल आणि २० एप्रिल रोजीही पती व दीर यांनी पुन्हा शिवीगाळ व दमदाटी करून छळ केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. आरोपींकडून वारंवार शारीरिक व मानसिक त्रास देण्यात आल्याचेही तिने नमूद केले आहे. या प्रकरणी पती सैय्यद समीर सैय्यद सलीम, सासू रजियाबी सैय्यद सलीम, आजेसासू सैय्यद फातीमा सैय्यद रहिमान आणि दीर सैय्यद शकील सैय्यद सलीम (सर्व रा. मलकापूर, जि. बुलढाणा) यांच्याविरुद्ध बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार तेजस पारसकर करीत आहेत.



