
जळगाव : प्रतिनिधी
घराच्या दुसऱ्या मजल्यावर चोरीच्या उद्देशाने शिरलेल्या साहील सद्दाम शहा (वय २१, रा. तांबापुरा) या संशयित चोरट्याला निहाल दिनेशकुमार हसिजा (वय ३१, रा. सिंधी कॉलनी) यांनी रंगेहाथ पकडले. ही घटना दि. २९ ऑगस्ट रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील सिंधी कॉलनी परिसरात निहाल दिनेशकुमार हसिजा हे वासतव्यास असून त्यांचा व्यवसाय आहे. दि. २९ ऑगस्ट रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास त्यांच्या घराच्या दुसऱ्या मजल्यावर संशयित साहील शहा हा चोरटा चोरी करण्याच्या उद्देशान अनधिकृतपणे शिरला. तसेच घरातील कपाट उघडून त्यातील ऐवज चोरी करतांना त्याला हसिजा कुटुंबियांनी रंगेहाथ पकडले. दरम्यान, संशयिताला पोलीस ठाण्यात घेवून गेले असता, त्याने पोलिसात तक्रार दिली तर तुम्हाला जीवंत ठेवणार नाही अशी धमकी दिली. निलाह हसिजा यांनी एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली असून त्यानुसार साहील सद्दाम शहा (वय २१, रा. तांबापुरा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोना पंकज पाटील हे करीत आहे.



