
पाचोरा : प्रतिनिधी
पाचोरा ते जळगाव महामार्गावरील खेडगाव (नंदिचे) गावानजीक भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात २८ वर्षीय दुचाकीचालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना २६ ऑगस्टला सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे हनुमान नगरसह म्हसावद गावात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाचोऱ्यातील हनुमान नगरमधील शाहरुख मन्सुर पिंजारी (वय २८) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाने नाव आहे. दरम्यान, शाहरुख पिंजारी हे ईद ए मिलाद साजरी करुन दुचाकीने म्हसावद येथे सासरवाडीला जात होते. दरम्यान, जळगावकडुन पाचोऱ्याच्या दिशेने येणाऱ्या ट्रकने शाहरुख पिंजारी यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. खेडगाव (नंदिचे) गावानजीक झालेल्या या अपघातात शाहरुख पिंजारी यांचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, मयत शाहरुख पिंजारी यांच्या पाश्चात्य वृद्ध आई, वडिल, पत्नी, दीड वर्षाचा मुलगा, दोन भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे. शाहरुख पिंजारी यांचा अपघाती मृत्यू झाल्याने पिंजारी कुटुबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शाहरुख पिंजारी हे मिस्तरी काम करुन आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह चालवत होते. या घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये रात्री उशिरापर्यंत ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. या घटनेमुळे हनुमान नगरसह म्हसावद गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.



