तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी अॅक्शन मोडवर; तीन पथकांच्या कारवाईने वाळूमाफियांचे धाबे दणाणले
धरणगाव | प्रतिनिधी : तालुक्यात अवैध वाळू उपसा आणि विनापरवाना वाळूसाठ्यांविरोधात महसूल विभागाने धडक मोहीम सुरू केली आहे. तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागाच्या तीन स्वतंत्र पथकांनी तालुक्यातील विविध भागांत एकाचवेळी आकस्मिक तपासणी करत सुमारे १० ते १२ लहान-मोठे बेवारस वाळूसाठे जप्त केले. महसूल विभागासोबत पोलिसांनीही सहकार्य केल्याने अवैध वाळू व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.
बांभोरीसह बाभुळगाव, नारणे परिसरात कारवाई
महसूल पथकांनी बांभोरी परिसरातील रेल्वे पूल, स्मशानभूमी, तुटका पूल, दत्तमंदिर परिसर, पत्रकार कॉलनी आणि सिद्धिविनायक परिसरात आकस्मिक तपासणी केली. याशिवाय बाभुळगाव आणि नारणे परिसरातही स्वतंत्र पथकांमार्फत कारवाई करण्यात आली.
तपासणीदरम्यान विविध ठिकाणी विनापरवाना साठवून ठेवलेली वाळू आढळून आली. या साठ्यांवर कोणाचाही दावा नसल्याने महसूल विभागाने ते बेवारस वाळूसाठे म्हणून जप्त केले. जप्त साठ्यांबाबत नियमानुसार पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
तीन स्वतंत्र पथकांची धडक मोहीम
या कारवाईसाठी महसूल विभागाने तीन स्वतंत्र पथके तैनात केली होती. या पथकांमध्ये मंडळ अधिकारी, तलाठी, ग्राममहसूल अधिकारी, कोतवाल तसेच महसूल विभागातील इतर अधिकारी-कर्मचाऱ्यांचा समावेश होता.
बाभुळगाव परिसरातील पथकात मंडळ अधिकारी मोहन महाजन, ग्राममहसूल अधिकारी दीपक पाटील, राकेश पवार आणि कोतवाल शालिग्राम कुवर यांनी सहभाग घेतला.
नारणे परिसरातील पथकात मंडळ अधिकारी ज्योती चौधरी, कळमेक, तलाठी संदेश महाजन, रोशन ठाकरे आणि चंद्रकांत बोरसे यांनी कारवाई केली.
तर बांभोरी परिसरातील कारवाईत अमोल पाटील, मनोहर बावीस्कर, प्रकाश जामोदकर, मोहन चौगुले, अनिकेत खाडे, विलास धाडले, गौरव बाविस्कर, फिरोज खाटीक आणि तायडे आप्पा यांच्यासह महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
महसूल-पोलिसांच्या समन्वयातून कारवाई
कारवाईदरम्यान धरणगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तसेच पाळधी दूरक्षेत्रातील पोलिसांचे मोलाचे सहकार्य लाभले. महसूल आणि पोलीस विभागाच्या समन्वयातून विविध ठिकाणी सुरू असलेल्या अवैध वाळूसाठ्यांवर प्रभावीपणे कारवाई करण्यात आली.
वाळूमाफियांवर प्रशासनाची करडी नजर
नदीपात्रातून वाळू उपसा करून विविध ठिकाणी बेकायदेशीररीत्या साठवणूक करणाऱ्यांविरोधात महसूल विभागाने आता कारवाईची मोहीम तीव्र केली आहे. तीन पथकांच्या एकाचवेळी झालेल्या कारवाईमुळे अवैध वाळू व्यवसाय करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली यापुढेही अवैध वाळू उपसा आणि विनापरवाना वाळूसाठ्यांविरोधात नियमित कारवाई सुरू राहणार असल्याचे महसूल विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या कारवाईमुळे धरणगाव तालुक्यातील वाळू तस्करीला आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.



