अमळनेर प्रतिनिधी : सत्ता महत्त्वाची नाही, तर विद्यार्थी, शेतकरी आणि कष्टकऱ्यांचा आवाज महत्त्वाचा आहे, अशी भूमिका घेत अमळनेर नगरपरिषदेच्या आरोग्य समितीचे माजी सभापती तथा भारतीय जनता पक्षाचे स्थानिक पदाधिकारी श्याम जयवंतराव पाटील यांनी भारतीय जनता पक्षाच्या सर्व पदांचा तसेच प्राथमिक सदस्यत्वाचा तत्काळ प्रभावाने राजीनामा दिला आहे. याबाबतचे पत्र त्यांनी भाजपचे जळगाव (पश्चिम) जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी यांच्याकडे पाठवले आहे.
राजीनामा पत्रात श्याम पाटील यांनी दिल्लीतील जंतर-मंतर आणि संसद भवन परिसरात शिक्षण, भविष्य आणि न्यायाच्या मागणीसाठी शांततामय आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्ज आणि पोलिसी कारवाईबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर संवाद साधण्याऐवजी त्यांच्यावर बळाचा वापर करण्यात आल्याने आपण व्यथित झालो असून, ही घटना लोकशाहीच्या मूल्यांना धक्का देणारी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
तसेच, भारतीय जनता पक्षाच्या विद्यमान धोरणांमुळे विद्यार्थी, शेतकरी आणि कष्टकरी वर्गासमोर निर्माण झालेल्या गंभीर प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर जनहिताला प्राधान्य देण्याचा निर्णय घेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. पक्षातील भूमिका आणि आपल्या वैचारिक भूमिकेत मूलभूत मतभेद निर्माण झाल्याने आपण हा निर्णय घेत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
राजीनाम्यानंतरही विद्यार्थी, शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या हक्कासाठी, सामाजिक प्रश्नांवर आणि लोकहिताच्या लढ्यात आपण पूर्वीप्रमाणेच प्रामाणिकपणे कार्यरत राहणार असल्याचा निर्धार श्याम पाटील यांनी व्यक्त केला आहे.



