जळगाव | प्रतिनिधी
जळगाव शहरातील रस्ते अधिक सुरक्षित, सुशोभित आणि आधुनिक करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आमदार सुरेश दामू भोळे (राजूमामा) यांच्या गेल्या दोन वर्षांपासूनच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाले असून, जिल्हा नियोजन समितीच्या सन २०२६-२७ च्या अर्थसंकल्पातून अपारंपारिक ऊर्जा विकास लेखाशीर्ष अंतर्गत ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
या निधीतून अजिंठा चौफुली ते जळगाव विमानतळ या प्रमुख मार्गावर आधुनिक एलईडी पथदिव्यांची उभारणी केली जाणार आहे. त्यामुळे या मार्गावरील प्रकाश व्यवस्था अधिक सक्षम होऊन वाहनचालक, पादचारी आणि विमानतळाकडे जाणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षिततेत मोठी भर पडणार आहे. तसेच शहराच्या सौंदर्यातही लक्षणीय वाढ होणार आहे.
या प्रकल्पासाठी आमदार राजूमामा यांनी सातत्याने शासनाकडे पाठपुरावा केला होता. या कामासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि मंत्री गिरीश महाजन यांचेही विशेष सहकार्य लाभल्याचे सांगण्यात आले.
निधी मंजूर झाल्यानंतर आमदार राजूमामा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री गिरीश महाजन, मंत्री संजय सावकारे आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आभार मानले.
यावेळी आमदार राजूमामा म्हणाले, “जळगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांसाठी सातत्याने पाठपुरावा सुरू असून, भविष्यातही शहरासाठी अधिकाधिक निधी उपलब्ध करून नागरिकांना दर्जेदार सुविधा देण्याचा प्रयत्न कायम राहील.”



