आयुक्त ॲक्शन मोडवर; तक्रारीची दखल घेत तातडीने अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाठवले
जळगाव | प्रतिनिधी
जळगाव शहरातील प्रभाग क्रमांक १३ मधील मेहरूण सर्वे नं. ४९०/१ ते ४०६, ४०७ मार्गे जाणारा मोहाडी रोड ते शिरसोली मुख्य शिवरस्ता अखेर नव्याने करण्यात येणार आहे. प्रभागातील चारही नगरसेवकांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
नगरसेविका वैशाली अमित पाटील यांनी या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था, तसेच विद्यार्थी, शालेय बस, पालक, मजूर, नोकरदार, व्यापारी आणि दररोज या मार्गाने प्रवास करणाऱ्या हजारो नागरिकांना होत असलेल्या हालअपेष्टा महापालिका आयुक्त यांच्या निदर्शनास आणून दिल्या होत्या.
या मागणीची गंभीर दखल घेत आयुक्तांनी तत्काळ संबंधित अधिकाऱ्यांना ऑन-द-स्पॉट पाहणी करून वस्तुस्थितीचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. नागरिकांच्या दैनंदिन अडचणी आणि भावना समजून घेत आयुक्तांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे प्रशासनाने या कामाला गती दिली असून परिसरातील नागरिकांनी त्यांच्या संवेदनशील भूमिकेचे स्वागत केले आहे.
त्यानुसार महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी रस्त्याच्या पुनर्बांधणीसाठी अंदाजपत्रक तयार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून आवश्यक प्रशासकीय व तांत्रिक मंजुरीनंतर काम युद्धपातळीवर हाती घेतले जाणार असल्याची माहिती देण्यात आली.
हा रस्ता शहरातील अत्यंत वर्दळीचा असून दररोज शेकडो विद्यार्थी, शालेय बस, पालक, मजूर, नोकरदार, व्यापारी आणि नागरिक या मार्गाचा वापर करतात. रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका वाढला होता. त्यामुळे या कामामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
याशिवाय रस्त्यालगत असलेल्या मोठ्या नाल्याला संरक्षक भिंत उभारण्याची मागणीही करण्यात आली आहे. पावसाळ्यात नाल्यामुळे अपघाताचा धोका निर्माण होत असल्याने ही मागणीही प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
या संपूर्ण पाठपुराव्यात नगरसेविका वैशाली अमित पाटील, स्थायी समिती सदस्य नगरसेवक नितीन सपके, नगरसेविका सुरेखाताई तायडे आणि नगरसेवक प्रफुल्ल देवकर यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे रस्त्याच्या प्रश्नावर प्रशासनाने तातडीने निर्णय घेतल्याने प्रभाग क्रमांक १३ मधील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.



