मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शरद पवार यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होण्याच्या चर्चांदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धर्मरावबाबा आत्राम यांनी शरद पवार गटाला वेगळीच ऑफर दिली आहे.
धर्मरावबाबा आत्राम यांनी माध्यमांशी बोलताना शरद पवार गटाने काँग्रेसमध्ये विलीन होण्याऐवजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये यावे, असे आवाहन केले. “शरद पवार गट काँग्रेसमध्ये गेल्यास ते डुबत्या नावेत बसल्यासारखे ठरेल. काँग्रेसमध्ये जाऊन कोणताही राजकीय फायदा होणार नाही. आमचा पक्ष मोठा भाऊ असून सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली शरद पवार गटाने एकत्र यावे,” असे आत्राम यांनी म्हटले.
यावेळी त्यांनी शहरी नक्षलवादाच्या मुद्द्यावरही भाष्य केले. “जंगलातील नक्षलवाद मोठ्या प्रमाणात संपुष्टात आला असला तरी शहरी नक्षलवादाचे आव्हान कायम आहे. सरकारविरोधी आंदोलनांमध्ये शहरी नक्षलवादी सक्रिय असल्याचे दिसून येते. गडचिरोलीसारख्या भागातही शहरी नक्षलवाद डोके वर काढत आहे,” असा दावा त्यांनी केला.
देशभरात चर्चेत असलेल्या ‘कॉकरोच जनता पार्टी’ आंदोलनाबाबतही आत्राम यांनी भाष्य केले. “नागपुरातील आंदोलनात शहरी नक्षलवादी सहभागी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरुणांची दिशाभूल करून त्यांना भडकवण्याचे काम काही घटकांकडून सुरू आहे,” असे ते म्हणाले. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याच्या चर्चांवर खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी अशा कोणत्याही चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला.
“आमच्या पक्षातील कोणत्याही आमदार, खासदार किंवा पदाधिकाऱ्यांशी काँग्रेसकडून संपर्क झालेला नाही. आम्हीदेखील कोणाशी संपर्क साधलेला नाही. विलीनीकरणाची चर्चा नेमकी कुठून सुरू झाली, हेच आम्हाला माहिती नाही,” असे सुळे यांनी स्पष्ट केले. त्या पुढे म्हणाल्या, “शरद पवार यांच्याकडे कोणताही विलीनीकरणाचा प्रस्ताव आलेला नाही आणि त्यांनीदेखील कोणालाही असा प्रस्ताव दिलेला नाही. त्यामुळे या चर्चांना कोणताही तथ्याधार नाही.”
विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेल्या या चर्चांमुळे राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापले असून आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांची भूमिका काय राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



