जळगाव : प्रतिनिधी
अल्पवयीन मुलीला अमली पदार्थांचे व्यसन लावल्याप्रकरणी उघडकीस आलेल्या ड्रग रॅकेटमधील संशयित आरोपी रईस हारून देशमुख याच्या सुप्रीम कॉलनीतील घराच्या अतिक्रमणावर जळगाव महापालिकेने बुलडोझर चालवत कारवाई केली. घरासमोरील दोन दुकानांचे अनधिकृत बांधकाम पाडण्यात आले. कारवाईदरम्यान मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगावात अल्पवयीन मुलीला ड्रग्ज पुरवून त्यांना व्यसनाधीन बनविणाऱ्या रॅकेटचा अलीकडेच पर्दाफाश झाला आहे. या प्रकरणात रईस हारून देशमुख, तौसिफ सय्यद आरिफ आणि कृणाल उर्फ लकी रमेश पाटील यांना अटक करण्यात आली असून, मुख्य आरोपी अमदज उर्फ बिल्डर शेख व इम्रान उर्फ हुसेन भिस्ती हे अद्याप फरार आहेत. त्यांच्या शोधासाठी पोलिसांची विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने केलेल्या पाहणीत रईस देशमुख याच्या घरासमोरील दोन दुकानांचे बांधकाम नियमबाह्य आढळले. त्यानंतर उपायुक्त गोसावी यांच्या नेतृत्वाखाली अतिक्रमण निर्मूलन पथकाने कारवाई करत अनधिकृत बांधकाम हटविले.
या वेळी महापौर दीपमाला काळे, उप आयुक्त पंकज गोसावी, एमआयडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक बबन आव्हाड यांच्यासह महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाचे अधीक्षक संजय ठाकुर व त्यांचे पथक आणि पोलिस कर्मचारी उपस्थित होते. शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तींवर वचक बसविण्यासाठी अशा कारवाया यापुढेही सुरू राहतील, असा इशारा महापौर दीपमाला काळे यांनी दिला आहे.
महापौर दीपमाला काळे व नगरसेवक अरविंद देशमुख यांनी शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तींवर वचक बसण्यासाठी गुन्हेगारांच्या घरांवर बुलडोजरू चालविण्याची मागणी मनपा आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांच्याकडे केली. आयुक्तांच्या आदेशानुसार उपायुक्त व अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाने एमआयडीसी पोलिस स्टेशनला कारवाईची माहिती देत पोलिस बंदोबस्ताची मागणी केली. यानंतर पथक ड्रग्स प्रकरणातील मुख्य आरोपी अमदज उर्फ बिल्डर शेख याच्या फातेमा नगरातील घरावर कारवाईसाठी गेले. पथक फातेमानगरात पोहचल्यानंतर मनपाच्या नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, फातेमा नगर जळगाव शहराच्या हद्दीत येत नाही, त्यामुळे तेथे कारवाई करता येणार नसल्याने मनपाचे पथक तेथून खाली हाथ परतले. मात्र, कारवाई न झाल्यास त्याचा चुकीचा मॅसेज समाजात जाईल म्हणून, महापौरांनी याचा प्रकरणातील दुसरा आरोपी रईस हारून देशमुख याने सुप्रिम कॉलनीमधील त्याच्या घराला लागून अनधिकृत बांधलेल्या दोन दुकाने काढण्याचे आदेश दिले. त्यानुसार रात्री ८.४० वाजेच्या सुमारास दोन्ही दुकाने तोडण्याची कारवाई करण्यात आली.



