मुंबई : वृत्तसंस्था
प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत केलेल्या विधानानंतर राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते व उद्योगमंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया देत मुख्यमंत्रीपदाबाबतची बच्चू कडू यांची मागणी ही त्यांची वैयक्तिक भूमिका असल्याचे स्पष्ट केले.
उदय सामंत म्हणाले की, मुख्यमंत्रीपदाबाबत बच्चू कडू यांची काही मागणी असेल, तर ती त्यांची वैयक्तिक भूमिका आहे. या संदर्भात माझी त्यांच्याशी चर्चा झाली आहे. मुख्यमंत्रीपदासाठी एखाद्या नेत्याची मागणी करणे ही स्वाभाविक बाब आहे. जशी भाजपकडून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत अशी मागणी केली जाते, त्याचप्रमाणे शिवसेनेचीही भूमिका स्पष्ट असून एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री व्हावे, अशी आमची इच्छा आणि मागणी असल्याचे त्यांनी सांगितले.
सामंत पुढे म्हणाले की, बच्चू कडू यांनी काही सूचना आणि विनंत्या मांडल्या होत्या. त्या त्यांनी संबंधित नेतृत्वापर्यंत पोहोचवल्या आहेत. महायुतीतील घटक पक्षांमध्ये संवाद सुरू असून मुख्यमंत्रीपदाबाबत अंतिम निर्णय योग्य वेळी वरिष्ठ नेतृत्व घेईल.
दरम्यान, बच्चू कडू यांच्या विधानामुळे महायुतीतील मुख्यमंत्रीपदाच्या चर्चांना पुन्हा एकदा वेग आला आहे. आगामी राजकीय घडामोडींमध्ये मुख्यमंत्रीपदाचा मुद्दा चर्चेचा केंद्रबिंदू ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, महायुतीतील नेत्यांकडून एकजुटीचा संदेश देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही दिसून येत आहे.



