विजय पाटील लाईव्ह महाराष्ट्र न्युज : धरणगाव तालुक्यात कृत्रिम दूध तयार करून विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, याप्रकरणी धरणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अन्न सुरक्षा विभागाच्या तक्रारीवरून पोलिसांनी संबंधित आरोपीविरोधात कारवाई सुरू केली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, धरणगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि. नं. 207/2026 दाखल करण्यात आला असून, अन्न सुरक्षा मानके अधिनियम 2026 कलम 26(1), 27(3), 59 तसेच BNS कलम 274, 275, 123, 318 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी आकाश कैलास बोराडे यांनी फिर्याद दिली असून, सोमनाथ आनंद माळी (वय 32, रा. भवरखेडा ता. धरणगाव) याला आरोपी करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा रिफाइंड पामोलीन तेलापासून तयार करण्यात आलेले कृत्रिम दूध चांगल्या दुधात मिसळून त्यातील फॅट कृत्रिमरीत्या वाढवत होता. आर्थिक फायद्याच्या उद्देशाने हे भेसळयुक्त दूध विक्रीसाठी वापरले जात असल्याचा आरोप आहे.
या प्रकारामुळे नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला असून, अन्न सुरक्षेशी खेळ करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. सध्या पोलिस पुढील तपास करीत आहेत.



