मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील राजकारणात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवे संकेत देणारे विधान सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांनी केले आहे. प्रत्येक पक्षाला स्वतःचा विस्तार करण्याचा अधिकार असल्याचे सांगताना त्यांनी 2029 च्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना स्वतंत्रपणे लढू शकतात, असे स्पष्ट केले. या वक्तव्यामुळे सत्ताधारी युतीच्या भवितव्याबाबत नव्या चर्चांना उधाण आले आहे.
आज पत्रकारांशी संवाद साधताना शिरसाट म्हणाले की, राजकारणात कोणतेही कायमस्वरूपी बंधन किंवा करार नसतो. प्रत्येक पक्ष आपापल्या पद्धतीने तयारी करत असतो. त्यामुळे 2029 ला भाजप किंवा शिवसेना स्वतंत्रपणे निवडणूक लढवू शकतात. यामध्ये काहीही गैर नसून, प्रत्येक पक्षाला स्वतःचा पक्ष वाढवण्याचा पूर्ण अधिकार आहे.
ते पुढे म्हणाले की, भूतकाळात आपण शिवसेना-भाजप युती तुटल्याचेही पाहिले आहे. त्यामुळे भविष्यातील समीकरणांबाबत कोणतीही शक्यता नाकारता येत नाही. “आम्ही आमची तयारी करतो, तसेच इतर पक्षही आपापली रणनीती आखत असतात. यात कुणालाही थांबवले जात नाही,” असेही त्यांनी नमूद केले.
या वेळी शिरसाट यांनी शिवसेना उद्धव ठाकरे या पक्षावरही जोरदार निशाणा साधला. काँग्रेस आणि शरद पवार गट ठाकरे गटाच्या नेत्याला पुन्हा मुख्यमंत्री करतील, अशी अपेक्षा ठेवणे म्हणजे केवळ स्वप्नरंजन असल्याचे त्यांनी म्हटले. वास्तव स्वीकारून राजकारण करणे आवश्यक असल्याचा सल्लाही त्यांनी दिला. “दुसऱ्यावर टीका करून पक्ष वाढत नाही. आमचा पक्ष कसा मजबूत होईल, यावर आम्ही लक्ष केंद्रित करतो,” असे सांगत त्यांनी विरोधकांवर अप्रत्यक्ष टीका केली.
शिरसाट यांनी यावेळी शिवसेनेत प्रवेश केलेल्या Bachchu Kadu यांच्यावरही टीका केली. “बच्चू कडूंना राजकारणाची दिशा चांगली माहिती आहे. त्यांनी पूर्वी काँग्रेससोबत केलेला घरोबा काय आत्महत्या नव्हती का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच त्यांनी काँग्रेससोबतच्या त्यांच्या राजकीय संबंधांवरही उपरोधिक टिप्पणी केली.



