मुंबई : वृत्तसंस्था
महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडून नीलम गोऱ्हे आणि बच्चू कडू यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी शिंदे यांनी उद्धव ठाकरे आणि काँग्रेसवर जोरदार टीका करत राजकीय वातावरण तापवले.
शिंदे म्हणाले की, “लढायची वेळ आली की काहीजण स्वतः पुढे न येता इतरांना पुढे करतात,” असा टोला त्यांनी ठाकरे यांना लगावला. तसेच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उमेदवार न देण्यामागे ‘अंतरआत्म्याचा आवाज’ असल्याचे सांगितल्यावर शिंदेंनी त्यावरही उपरोधिक टीका केली. “आत्मा हरवलेल्या लोकांच्या अंतरआत्म्यातून आवाज येतो का? २०१९ ला तो आत्मा कुठे होता?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
दरम्यान, विधानपरिषदेच्या १० जागांसाठी केवळ १०च अर्ज दाखल झाल्याने ही निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यावर बोलताना शिंदे यांनी सर्व पक्षांचे आभार मानत ही निवडणूक खेळीमेळीच्या वातावरणात होत असल्याचे सांगितले.
बच्चू कडू यांच्या उमेदवारीबाबत बोलताना शिंदे यांनी त्यांच्या २५ वर्षांच्या सामाजिक कार्याचा विशेष उल्लेख केला. “गोरगरीब, शोषित आणि दिव्यांगांसाठी त्यांनी सातत्याने काम केले आहे. त्यांच्या समावेशामुळे शिवसेना आणि कडू या दोघांचीही ताकद वाढेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
तसेच महायुतीतील शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी यांनी अतिरिक्त उमेदवार न दिल्यामुळे निवडणूक बिनविरोध होत असल्याचे स्पष्ट करत, “सर्व पक्षांनी समंजसपणाची भूमिका घेतली, यासाठी त्यांचे स्वागत केले पाहिजे,” असेही शिंदे यांनी नमूद केले.
एकूणच, विधानपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून, शिंदे यांच्या टीकेमुळे पुढील राजकारणात नवे वळण येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.



