जळगाव : प्रतिनिधी
राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडली असून ‘प्रहार’ संघटनेचे आक्रमक नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे बच्चू कडू यांनी आज शिवसेनेत (शिंदे गट) अधिकृत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. विशेष म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधत हा राजकीय निर्णय घेण्यात आला. या प्रवेशासोबतच शिवसेनेकडून बच्चू कडू यांना विधान परिषदेची उमेदवारीही जाहीर करण्यात आली असून, त्यांच्या नव्या राजकीय प्रवासाची अधिकृत सुरुवात झाली आहे.
प्रवेशावेळी बोलताना बच्चू कडू यांनी आपल्या भूमिकेचा स्पष्ट उच्चार केला. “राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ‘ग्रामगीता’ शेतकऱ्यांना अर्पण केली होती. त्याच विचाराने आम्ही आज शिवसेनेसोबतचा प्रवास सुरू करत आहोत. शेतकरी आणि दिव्यांगांच्या हक्कासाठी हा धनुष्यबाण आम्ही मजबुतीने पेलू,” अशी ग्वाही त्यांनी दिली. आपली राजकीय सुरुवातही शिवसेनेतूनच झाल्याचे सांगत, “आता पुढील कार्य अधिक प्रभावीपणे याच पक्षातून करणार,” असे त्यांनी स्पष्ट केले.
एकनाथ शिंदे यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक करत बच्चू कडू म्हणाले की, “केवळ पदासाठी नाही, तर मुद्द्यांची लढाई अधिक मजबूत व्हावी म्हणून हा निर्णय घेतला. शिंदे साहेबांचा सेवाभावी स्वभाव, दिव्यांग मंत्रालयासारखे ऐतिहासिक निर्णय आणि शेतकऱ्यांसाठी घेतलेले निर्णय हे प्रेरणादायी आहेत.”
दिव्यांग मंत्रालय बळकट करणे, हमीभाव, शेतकरी हित, कामगार व विधवा महिलांचे प्रश्न आणि युवकांसाठी धोरण – या मुद्द्यांवर पुढेही लढा सुरू राहील, असे त्यांनी सांगितले.
बच्चू कडू यांनी स्पष्ट केले की, ‘प्रहार’ ही संघटना सामाजिक कार्य करत राहील; मात्र राजकीय स्तरावर शिवसेना मजबूत करण्यासाठी ते पूर्ण ताकदीने काम करतील. “झेंडा बदलला असला तरी अजेंडा तोच आहे. प्रहारचा पांढरा झेंडा आणि शिवसेनेचा भगवा – दोन्हींचा उद्देश सामान्यांचा न्याय हा आहे,” असे ते म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनुसार ‘रयतेचे राज्य’ पुन्हा उभे करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची भूमिका त्यांनी मांडली.
यावेळी एकनाथ शिंदे यांनी बच्चू कडू यांचे स्वागत करत त्यांच्या कार्याचा गौरव केला. “सर्वसामान्यांचा नेता, दिव्यांगांसाठी झटणारा, शोषित-पीडितांसाठी लढणारा असा तुमचा लढाऊ स्वभाव आहे. शिवसेनेत तुमचे मनापासून स्वागत,” असे ते म्हणाले. शिवसेना बच्चू कडूंना नवीन नसल्याचे सांगत, “तुम्ही मूळचे शिवसैनिक आहात. विचारांची लढाई विचारानेच लढायची आहे,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बच्चू कडू यांच्या या निर्णयामुळे राज्यातील राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषतः शेतकरी, दिव्यांग आणि सर्वसामान्यांच्या मुद्द्यांवर आक्रमक भूमिका घेणारा नेता शिवसेनेत दाखल झाल्याने आगामी निवडणुकांमध्ये त्याचा प्रभाव दिसून येण्याची शक्यता आहे.



