अहमदनगर : वृत्तसंस्था
जिल्ह्यातील राहुरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असून वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी भाजप नेते तथा मंत्री नीतेश राणे आणि आमदार संग्राम जगताप यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राहुरीत गेल्या काही वर्षांपासून धार्मिक वातावरण बिघडवून दंगल घडवण्याचे षडयंत्र सुरू असल्याचा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला.
राहुरी विधानसभेची पोटनिवडणूक येत्या २३ तारखेला होत असून वंचित बहुजन आघाडीकडून संतोष चोळके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पक्षाचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या सभेनंतर सुजात आंबेडकर यांनीही प्रचारात सक्रिय सहभाग घेत सभा घेतली. या सभेत त्यांनी विरोधकांवर सडकून टीका करत मतदारांना आवाहन केले.
सुजात आंबेडकर म्हणाले की, “राहुरीत गेल्या तीन-चार वर्षांपासून हिंदू-मुस्लिमांमध्ये द्वेष पसरवण्याचा प्रयत्न सुरू आहे. भाजपचे एक ‘दोन फुटांचे’ नेते म्हणजे नीतेश राणे असून त्यांनी येथे येऊन लव्ह जिहादच्या नावाखाली भडकाऊ वक्तव्य केले होते. मात्र, ज्या ठिकाणी त्यांनी द्वेष पसरवला, त्याच ठिकाणी वंचितने सभा घेऊन त्यांना प्रत्युत्तर दिले.”
याचबरोबर त्यांनी आमदार संग्राम जगताप यांच्यावरही टीका करत, “राणेंनंतर आणखी एक ‘आयटम’ तयार झाला आहे, तो म्हणजे संग्राम जगताप,” असा उल्लेख केला. जगताप हे सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले आणि त्यांना मुस्लिम मतदारांनी पाठिंबा दिला होता. मात्र, आता स्वतःचे राजकीय अस्तित्व वाढवण्यासाठी तेच मतदारांवर टीका करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
दरम्यान, या पोटनिवडणुकीत मुख्य लढत वंचित बहुजन आघाडी आणि भाजप यांच्यातच असल्याचा दावा सुजात आंबेडकर यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांनी दिलेला उमेदवार हा ‘डमी’ असल्याचा आरोप त्यांनी करत, हा उमेदवार भाजपच्या फायद्यासाठी उभा करण्यात आल्याचे म्हटले. काही आर्थिक व्यवहार आणि राजकीय ‘सेटिंग’मधून हा निर्णय झाल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
“मतदारांनी ‘सेटिंगच्या राजकारणा’पासून सावध राहावे आणि पर्याय म्हणून वंचित बहुजन आघाडीला संधी द्यावी,” असे आवाहन करत त्यांनी प्रचारसभेचा शेवट केला.



