वरणगाव : प्रतिनिधी
येथील भोईवाडा परिसरातील रहिवासी रितेश रवींद्र सोनवणे (३०) यांचा अक्षय तृतीयेच्या दिवशी (दि. १९) सकाळी साडेसात वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने अकस्मात मृत्यू झाला. लग्नास अवघे आठ दिवस शिल्लक असताना घडलेल्या या घटनेने दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रितेश यांचा विवाह दि. २८ एप्रिल रोजी देवधाबा (ता. मलकापूर, जि. बुलढाणा) येथील पांडुरंग बोरसे यांच्या मुलीसोबत निश्चित झाला होता. घरात लग्नाची तयारी, खरेदी व आनंदाचे वातावरण सुरू असतानाच ही घटना घडली. अक्षय तृतीयेच्या पूजनाची तयारी सुरू असताना अचानक रितेश यांना झटका आल्याने कुटुंबीयांवर शोककळा पसरली. दोन दिवसांपूर्वीच मित्रपरिवाराने त्यांचा वाढदिवस साजरा केला होता. या घटनेमुळे वरणगाव शहरात हळहळ व्यक्त होत असून नागरिकांनी सण बाजूला ठेवून कुटुंबीयांच्या दुःखात सहभाग घेतला. सकाळी ११ वाजता स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई-वडील, लहान भाऊ असा परिवार आहे.



