वरणगाव : प्रतिनिधी
शहरातील भवानी नगर परिसरात घरासमोर उभी केलेली चारचाकी गाडी हटविण्यास सांगितल्याच्या कारणावरून पती-पत्नीस मारहाण झाल्याची घटना घडली. या प्रकरणी पाच ते सहा जणांविरुद्ध वरणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिलीप हरी चौधरी (रा. भवानी नगर) यांनी फिर्याद दिली. शनिवारी रात्री सुमारे सव्वादहा वाजेच्या सुमारास नाजीमअली गोबा याने चौधरी यांच्या घरासमोर चारचाकी उभी केली होती. पाणी भरण्यास अडचण होत असल्याने गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग आल्याने आरोपींनी शिवीगाळ करत दिलीप चौधरी यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
दरम्यान, पत्नी सरला चौधरी यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही मारहाण करण्यात आली. झटापटीत त्यांच्या गळ्यातील सुमारे तीन तोळ्यांची मंगळपोत तुटून नुकसान झाले.



