मुंबई : वृत्तसंस्था
राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी गृहविभागाची तातडीची आढावा बैठक घेत विविध संवेदनशील प्रकरणांच्या तपासाबाबत पोलिसांना स्पष्ट आणि कडक निर्देश दिले. नाशिकमधील भोंदू अशोक खरात प्रकरण, आयटी धर्मांतर प्रकरण, तसेच गोरेगाव ड्रग्ज आणि परतवाडा प्रकरणांचा त्यांनी सविस्तर आढावा घेतला.
बैठकीस पोलिस महासंचालक, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, एसआयटी प्रमुख आणि वरिष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित होते. या वेळी “कोणताही आरोपी असो, त्याच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे” असा ठाम संदेश मुख्यमंत्र्यांनी दिला.
अशोक खरात प्रकरणाबाबत बोलताना मुख्यमंत्र्यांनी पीडित महिलांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश दिले. “पीडितांना पूर्ण विश्वास द्या आणि न्याय मिळवून देण्यासाठी तपासात कोणतीही कसूर ठेवू नका,” असे ते म्हणाले. न्यायालयात केस मजबूत राहण्यासाठी ठोस आणि भक्कम पुरावे गोळा करण्यावर त्यांनी विशेष भर दिला. “तपासात अपराधसिद्धी हाच सर्वात महत्त्वाचा घटक असला पाहिजे,” असे स्पष्ट शब्दांत त्यांनी सांगितले.
नाशिकमधील आयटी कंपनीशी संबंधित धर्मांतर प्रकरणाचीही त्यांनी गंभीर दखल घेतली. “राज्यात अशा प्रकारांना अजिबात वाव देता कामा नये. नाशिक पोलिसांनी हे प्रकरण समोर आणले, ही चांगली बाब आहे; मात्र आता तपासही तितकाच प्रभावी आणि सर्वंकष झाला पाहिजे,” असे ते म्हणाले. या प्रकरणातील प्रत्येक शक्य कोनातून तपास करण्याचे आदेश त्यांनी दिले.
गोरेगाव ड्रग्ज प्रकरणाबाबत बोलताना त्यांनी ड्रग्जविरोधात व्यापक मोहीम राबवण्याची गरज अधोरेखित केली. “तरुणांच्या भविष्याशी निगडित हा गंभीर विषय असून पोलिसांनी कठोर कारवाई करावी,” असे निर्देश त्यांनी दिले. परतवाडा प्रकरणात पीडितांना समुपदेशनाद्वारे पुढे येण्यास प्रोत्साहित करण्यावर त्यांनी भर दिला. “पीडितांना विश्वासात घेऊन त्यांना तक्रार करण्यासाठी प्रोत्साहित करा. आवश्यक असल्यास समाजसेवकांची मदत घ्या,” असे त्यांनी सुचवले. एकूणच, सर्व प्रकरणांत निष्पक्ष, सखोल आणि परिणामकारक तपास करत दोषींना शिक्षा होईल याची खात्री करण्यावर मुख्यमंत्र्यांनी भर दिला.



