नाशिक : वृत्तसंस्था
शहरातील एका नामांकित कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांच्या छळवणूक आणि कथित धर्मांतर प्रकरणात मोठा ट्विस्ट समोर आला असून, या संपूर्ण प्रकरणामागे निदा खान हीच मुख्य सूत्रधार असल्याचा धक्कादायक उलगडा पोलिस तपासातून झाला आहे. या प्रकरणी मुंबई नाका आणि देवळाली पोलीस ठाण्यात आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आतापर्यंत सात जणांना अटक करण्यात आली आहे. मात्र, मुख्य आरोपी निदा खान गेल्या २० दिवसांपासून फरार असल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
पोलिसांनी निदा खानच्या अटकेसाठी तीन स्वतंत्र पथके तयार केली असून विविध ठिकाणी शोधमोहीम सुरू आहे. तरीदेखील तिचा अद्याप ठावठिकाणा लागलेला नाही. कंपनीच्या ऑपरेशन विभागात मॅनेजर व टीम लीडर म्हणून काम पाहणारी निदा खानच या सर्व घडामोडींच्या केंद्रस्थानी असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, कंपनीतील नियमित मीटिंगच्या माध्यमातून काही महिला कर्मचाऱ्यांना लक्ष्य करण्यात येत होते. विशेषतः हिंदू तरुणींना वेगळे करून त्यांच्यावर मानसिक दबाव टाकला जात होता. त्यांना धर्मांतरासाठी प्रवृत्त करण्याचे प्रयत्न होत असल्याचे उघड झाले आहे. याला विरोध करणाऱ्या महिलांना मानसिक तसेच लैंगिक छळ सहन करावा लागत असल्याचेही तपासात समोर आले आहे. या सर्व कारवायांमध्ये निदा खान सक्रियपणे सहभागी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणातील अटक आरोपींपैकी कंपनीची एचआर अधिकारी अश्विनी चैनानी हिच्या चौकशीतूनही महत्त्वपूर्ण माहिती पुढे आली आहे. तिच्या जबाबातून निदा खानच या रॅकेटची प्रमुख असल्याचे स्पष्ट झाले आहे. सहा पुरुष व दोन महिला आरोपींचा समावेश असलेल्या या प्रकरणात एक व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करून नियोजनबद्ध पद्धतीने कारवाया केल्या जात असल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. त्यामुळे हे एक संघटित रॅकेट असल्याचा संशय अधिक बळावला आहे.
निदा खान २०२१ पासून संबंधित कंपनीत कार्यरत असून ती टीम लीडर पदावर होती. नाशिकच्या द्वारका परिसरात तिचे माहेर असून तिचे पती खासगी नोकरीत असल्याची माहिती आहे. नव्याने नोकरीला लागलेल्या महिलांना प्रशिक्षणासाठी स्वतः शिफारस करून त्यांना या जाळ्यात ओढले जात असल्याचा आरोपही समोर आला आहे. याशिवाय आर्थिक व्यवहारांमध्येही तिचा सहभाग असल्याचे संकेत मिळत आहेत.
दरम्यान, या प्रकरणाचा संपूर्ण उलगडा होण्यासाठी निदा खानची अटक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. तिच्या अटकेनंतर या रॅकेटमागील खरे सूत्रधार आणि संभाव्य आंतरराष्ट्रीय संबंध उघड होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे नाशिक पोलिसांसाठी हे प्रकरण अधिक गंभीर बनले असून येत्या काही दिवसांत आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे.



