पुणे : वृत्तसंस्था
मराठवाडा परिसरात पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आज सकाळी ८ वाजून ४७ मिनिटांनी हिंगोली जिल्ह्यात भूकंपाची नोंद झाली असून, त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.७ इतकी नोंदवण्यात आली आहे.
भूकंपाचे प्राथमिक केंद्र औंढा नागनाथ परिसरात असल्याची माहिती सुरुवातीला समोर आली होती. मात्र, पुढील तपासात वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे गावाजवळ भूकंपाचे मुख्य केंद्र असल्याचे स्पष्ट झाले आहे. काही सेकंद जमिनीला हादरे बसल्याची जाणीव नागरिकांना झाली.
या भूकंपाची नोंद लातूर येथील भूकंप मापन केंद्रावर करण्यात आली असून, संबंधित यंत्रणांनी तात्काळ माहिती संकलित केली. भूकंपाची तीव्रता मध्यम स्वरूपाची असली तरी अनेक ठिकाणी त्याचे धक्के स्पष्टपणे जाणवले.
हिंगोलीसह नांदेड आणि परभणी जिल्ह्यांमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. घरातील वस्तू हलल्याचे अनेक नागरिकांनी सांगितले. काही ठिकाणी घाबरलेल्या नागरिकांनी घराबाहेर धाव घेतली.
सुदैवाने, या घटनेत आतापर्यंत कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून असून नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.



