मुंबई : वृत्तसंस्था
नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या कुंभमेळ्याच्या कामांमध्ये कथित भ्रष्टाचार झाल्याच्या आरोपांवरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल करत गंभीर आरोप केले आहेत.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंत्रालयातील अर्थ व नियोजन विभागातील कक्ष अधिकारी विलास लाड याला ६ लाख ३७ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडल्याची घटना समोर आली आहे. यासंदर्भातील एक ऑडिओ क्लिपही सोशल मीडियावर व्हायरल झाली असून त्यामध्ये कुंभमेळ्याच्या टेंडर प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचे दावे करण्यात आले आहेत.
या पार्श्वभूमीवर विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधारी भाजप आणि महायुती सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. “भ्रष्टाचार संपवण्याच्या नावाखाली सत्तेत आलेलेच आता भ्रष्टाचाराचे लोणी खात आहेत. कुंभमेळ्यासारख्या पवित्र धार्मिक कार्यात कोट्यवधींचा गैरव्यवहार करणाऱ्यांना हिशोब द्यावाच लागेल,” असे ते म्हणाले. तसेच, धार्मिक घोषणांचा वापर करून जनतेचे लक्ष विचलित करण्याचा आरोपही त्यांनी केला.
दरम्यान, व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमध्ये विलास लाड हा नाशिकमध्ये २०२७ मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या तब्बल १५ हजार कोटी रुपयांच्या कामांबाबत धक्कादायक माहिती देताना ऐकू येतो. टेंडर प्रक्रियेत मंत्र्यांपासून ते कनिष्ठ कर्मचाऱ्यांपर्यंत कमिशन ठरल्याचा दावा त्यात करण्यात आला आहे. तसेच, तंबू उभारणी, ई-टॉयलेट्स, स्वच्छता आणि भोजन व्यवस्था यांसारख्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार झाल्याचेही सूचित केले आहे.
या प्रकरणामुळे कुंभमेळ्यासारख्या धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाच्या सोहळ्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, या आरोपांची सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. दरम्यान, या आरोपांवर सरकारकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नसून, पुढील काही दिवसांत या प्रकरणाचे पडसाद अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.



