मुंबई : वृत्तसंस्था
कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते पार्थ पवार यांच्या टीकेला उत्तर देताना “कोणाचा डाऊनफॉल होईल ते वेळच सांगेल, त्यामुळे मला यावर प्रतिक्रिया द्यायची नाही,” असे स्पष्ट मत व्यक्त केले. तसेच “ते अजून राजकारणात लहान आहेत, त्यामुळे त्यांच्यावर बोलणे योग्य नाही,” असे म्हणत त्यांनी पार्थ पवार यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली.
शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांच्यावरही पटोले यांनी निशाणा साधला. “संजय राऊत यांना त्यांच्या स्वतःच्या पक्षातच मान्यता नाही. आम्ही त्यांना मान्यता द्यावी, अशी अपेक्षा असेल तर त्यावर मी काही प्रतिक्रिया देणार नाही,” असे ते म्हणाले.
भाजपवर हल्लाबोल करताना पटोले यांनी गंभीर आरोप केले. “धर्म आणि भाषेच्या आधारावर भाजपने समाजात वाद निर्माण केले आहेत. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत गुजराती-मराठी वाद निर्माण होण्यामागे भाजपच कारणीभूत आहे. राज्याचे नेतृत्व प्रत्यक्षात महाराष्ट्रातील नसून गुजरातमधील लोक करत आहेत,” असा आरोप त्यांनी केला. “कॉंग्रेसच्या काळात असे वाद कधीही झाले नव्हते, भाजपने पेरलेले हे विष आता उफाळून येत आहे,” असेही त्यांनी म्हटले.
अशोक खरात प्रकरणावर बोलताना पटोले म्हणाले की, “या प्रकरणात आयएएस, आयपीएस अधिकारी आणि काही राजकीय व्यक्तींचे पैसे विदेशात पाठवले जात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ईडीची कारवाई स्वाभाविक आहे. मात्र, अशोक खरात हे केवळ एक टार्गेट असून यामागे राजकीय खेळी असल्याचा संशय आहे.”
यासोबतच त्यांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “अशोक खरात यांची पत्नी सापडत नाही, मग महाराष्ट्र पोलीस इतके कमकुवत आहेत का? याला गृहमंत्रालय जबाबदार आहे का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. “हे प्रकरण गंभीर असून पुढील काळात अनेक बाबी समोर येतील,” असा इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, कंत्राटदारांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यावर बोलताना पटोले यांनी सरकारवर खोटे बोलल्याचा आरोप केला. “विधानसभेत आणि बजेट अधिवेशनात आम्ही हा मुद्दा उपस्थित केला होता. सरकारने थकीत रक्कम नसल्याचे सांगितले होते. मात्र, प्रत्यक्षात सुमारे ८९ हजार कोटी रुपये कंत्राटदारांचे देणे बाकी आहे,” असे त्यांनी सांगितले. “देयके न मिळाल्यामुळे कंत्राटदारांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागत आहे. एका कंत्राटदाराने आत्महत्या केल्याची घटनाही समोर आली आहे. केवळ घोषणा करून केंद्र सरकारने निधी देणे थांबवले आहे,” अशी टीकाही पटोले यांनी केली. या सर्व मुद्द्यांवरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची चिन्हे दिसत आहेत.



