भुसावळ : प्रतिनिधी
शहरातील खडका चौफुली परिसरात भरधाव कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याची गंभीर घटना घडली असून या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. धडक दिल्यानंतर कार चालकाने घटनास्थळावरून पळ काढल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एरंडोल येथील सतिष प्रकाश धनगर (वय ३८) हे १ एप्रिल रोजी आपल्या मित्र आकाश माळी यांच्या दुचाकीवरून अंतुर्ली (ता. मुक्ताईनगर) येथे एका कार्यक्रमासाठी गेले होते. कार्यक्रम आटोपून परत येत असताना सायंकाळी सुमारे साडेचार वाजण्याच्या सुमारास खडका चौफुली येथील पूजा कॉम्प्लेक्सजवळ हा अपघात झाला.
मागून भरधाव वेगाने येणाऱ्या कारने (क्र. एमएच १९ ईए २४९९) धनगर यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत धनगर हे दुचाकीसह रस्त्यावर फेकले गेले. त्यांच्या डोक्याला, गालावर, हात, पाठ आणि गुडघ्यांना गंभीर दुखापती झाल्या आहेत.
अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तत्काळ धाव घेतली. दीपक काटकर आणि इतरांनी तातडीने मदत करत जखमी धनगर यांना रुग्णवाहिकेद्वारे ट्रॉमा केअर सेंटरमध्ये दाखल केले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, अपघात घडल्यानंतर कार चालकाने कोणतीही मदत न करता घटनास्थळावरून पळ काढला. या अपघातात धनगर यांचा मोबाईल फोनही हरवला आहे. या प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून फरार चालकाचा शोध सुरू आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.



