नाशिक : वृत्तसंस्था
नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात अत्यंत हृदयद्रावक अपघात घडला असून, पाण्याने भरलेल्या विहिरीत कार कोसळल्याने नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून, एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
ही भीषण घटना दिंडोरी शहरातील शिवाजीनगर परिसरात घडली. मिळालेल्या माहितीनुसार, दिंडोरी तालुक्यातील इंदोर गावातील सुनील दत्तू दरगोडे यांच्या कुटुंबीयांसह नातेवाईक एका खासगी क्लासच्या स्नेहसंमेलन कार्यक्रमावरून परतत होते. यावेळी त्यांच्या कारवरील चालकाचा ताबा सुटल्याने वाहन रस्त्याबाहेर जाऊन थेट पाण्याने भरलेल्या विहिरीत कोसळले.
अपघात इतका भीषण होता की, कार पूर्णपणे पाण्यात बुडाली आणि आत अडकलेल्या प्रवाशांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली व बचावकार्य सुरू केले.
या दुर्घटनेत लहान मुलांसह महिलांचाही समावेश असल्याने दुःख व्यक्त केले जात आहे. मृतांमध्ये तीन चिमुकले आणि दोन महिलांचा समावेश असून, एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे. मृतांची ओळख राखी सुनील दरगोडे, श्रद्धा अनिल दरगोडे, श्रावणी अनिल दरगोडे, सुनील दत्तू दरगोडे, उषा अनिल दरगोडे व इतर चार नातेवाईक अशी पटली आहे.
अपघातानंतर तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले. स्थानिक नागरिकांसह प्रशासन आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. अंधार आणि विहिरीतील पाण्यामुळे बचावकार्यात अडचणी निर्माण होत होत्या. अखेर क्रेनच्या सहाय्याने संबंधित कार विहिरीतून बाहेर काढण्यात आली. मात्र, तोपर्यंत कारमधील सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला होता.
सदर कार ही मारुती सुझुकी अर्टिगा (MH15-JS-1053) असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी अपघाताचा गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला असून, वाहनावरील ताबा का सुटला याचा शोध घेतला जात आहे. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण दिंडोरी तालुका शोकसागरात बुडाला असून, गावात हळहळ आणि शोक व्यक्त केला जात आहे.



