जामनेर : प्रतिनिधी
शेतात मका कापणीसाठी गेलेल्या चार पैकी एका शाळकरी मुलाचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला तर सोबतच्या तीन जणांना वाचवण्यात यश आले आहे. ही घटना नेरी दिगर परिसरातील शेतात शनिवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली. ओम बाळू बोरसे (१४, नेरी दिगर ता. जामनेर) असे या मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. तो जनता विद्यालयात इयत्ता ९ वीत शिक्षण घेत होता. गौरव शरद बोरसे, भावेश गोविंद वराडे आणि अंश शैलेश देसाई असे बचावलेल्या तीन मुलांची नावे आहेत. येथील एका शेतात शनिवारी काही शाळकरी मुले मका कापणीसाठी आले होते.
दुपारी त्यांच्या अंगाला खाज सुटल्याने ते शेतातील शेततळ्यात पोहण्यासाठी उतरले मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने ते पाण्यात बुडू लागले. ही घटना शेजारील शेतातील काही लोकांना लक्षात येताच त्यांनी पाण्यातून गौरव, भावेश आणि अंश या तिघांना बाहेर काढले. गावातील अनिल वासुदेव वराडे, संदीप झांबरे, प्रवीण भोई, पिंटू देवकर, नरेश वराडे, गबा वराडे यांच्यासह काहींनी ओमचा शोध घेतला असता त्याचा मृतदेहच हाती लागला. ओम हा एकुलता होता.
नातेवाईकाचे लग्न असल्याने त्याची आई दोन दिवसापासून जळगावला गेली आहे. शनिवारी ओम आणि त्याचे वडील त्या लग्नाला जाणार होते; मात्र सोबतच्या मित्रांच्या आग्रहाने तो शेतात गेला आणि जीव गमावून बसला.



