नाशिक : वृत्तसंस्था
अंधश्रद्धेच्या नावाखाली महिलांचे शोषण केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या भोंदू अशोक खरात प्रकरणात दररोज नवे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणाची चौकशी विशेष तपास पथक (SIT) मार्फत सुरू असून, न्यायालयाने खरात याला २९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तपासादरम्यान समोर येणाऱ्या माहितीमुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे.
चौकशीदरम्यान अशोक खरातने केलेले दावे अत्यंत वादग्रस्त ठरत आहेत. महिलांसोबत केलेली कृती ही ‘विधीचाच एक भाग’ असल्याचे सांगत त्याने आरोपांपासून बचाव करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच “मी कुणावरही जबरदस्ती केली नाही” आणि “मी लोकांचे भले केले, पण तेच माझ्यावर उलटले,” असे म्हणत त्याने आपली बाजू मांडली. याशिवाय “माझ्या अंतर्मनाने मला धोका दिला, आता मी फक्त मेंदूचे ऐकेन,” असे विधानही त्याने केल्याची माहिती समोर आली आहे. या विधानांमुळे तपास यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत.
दरम्यान, तपासासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणारा खरातचा मोबाईल फोन पोलिसांनी जप्त केला असून, त्यातील डेटा पुनर्प्राप्त करण्याचे काम सुरू आहे. या डिजिटल पुराव्यांमधून महत्त्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नाशिकमधील सरकार वाडा पोलिस ठाण्यात या प्रकरणी विविध गुन्हे दाखल करण्यात आले असून, तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास अधिक भक्कम करण्यावर भर दिला जात आहे.
याचबरोबर, खरातच्या ‘शिवानिका’ संस्थेच्या आर्थिक व्यवहारांचीही चौकशी सुरू आहे. संस्थेची बँक खाती सील करण्यात आली असून, त्याच्यासह कुटुंबीयांच्या नावावर असलेल्या मालमत्तेची माहिती नोंदणी विभागाकडून मागवण्यात आली आहे. राज्यभरातील जमीन, घरे आणि दुकाने यांचा तपशील तपासला जात असून, कोट्यवधींची संपत्ती कशी जमवली याचा शोध घेतला जात आहे.
तपासादरम्यान आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे खरातकडे असलेल्या बंदुकीच्या परवान्याची चौकशी. २०१२ मध्ये मंजूर झालेला हा परवाना २०२४ मध्ये नूतनीकरण करण्यात आल्याचे समोर आले आहे. त्याच्या फार्महाऊसवरून २१ काडतुसे जप्त करण्यात आली असून, त्यापैकी काही वापरलेली असल्याचे निष्पन्न झाले आहे. या काडतुसांचा वापर नेमका कुठे आणि कशासाठी झाला याचा तपास सुरू आहे.
दररोज समोर येणाऱ्या नव्या माहितीमुळे हे प्रकरण अधिकच गंभीर होत चालले असून, आगामी काळात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता नाकारता येत नाही.



