नाशिक : वृत्तसंस्था
महिलांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या भोंदू अशोक खरात याला न्यायालयाने ५ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असून, आता तो २९ मार्चपर्यंत पोलिसांच्या ताब्यात राहणार आहे. दरम्यान, सुनावणीदरम्यान पोलिसांनी आरोपीवर नरबळी दिल्याचा संशय व्यक्त केल्याने या प्रकरणाचे गांभीर्य अधिक वाढले आहे.
अशोक खरातची यापूर्वीची पोलिस कोठडी संपल्यानंतर आज त्याला पुन्हा नाशिक सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी पोलिसांनी पुढील तपासासाठी ७ दिवसांच्या कोठडीची मागणी केली. मात्र बचाव पक्षाने या मागणीला जोरदार विरोध दर्शविला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने ५ दिवसांची पोलिस कोठडी मंजूर केली.
सुनावणीदरम्यान विशेष तपास पथकाचे अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी यांनी न्यायालयात तपासाची सद्यस्थिती मांडताना अनेक धक्कादायक बाबी उघड केल्या. आरोपी अशोक खरात महिलांना खडे, पेढे देत असे तसेच पाण्यात काही पदार्थ मिसळून पाजत असे. त्यामुळे संबंधित महिलांना अस्वस्थ वाटत असे आणि त्यानंतर तो त्यांचे लैंगिक शोषण करत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
तपासादरम्यान आरोपीच्या फार्महाऊसमधून पिस्तूल, काडतुसे, धारदार शस्त्रे आणि काही इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त करण्यात आले आहे. तसेच काही काडतुसे गहाळ असल्याचे आढळून आले असून, त्यांचा वापर कुठे झाला का याचा तपास सुरू आहे. याशिवाय काही धार्मिक विधींमध्ये नरबळी दिल्याचा संशयही पोलिसांनी व्यक्त केला आहे.
आरोपी अशोक खरात स्वतःला ‘सिद्ध पुरुष’ असल्याचे भासवत लोकांची फसवणूक करत होता. नकली साप, वाघ आणि कस्तुरीसारख्या वस्तूंचा वापर करून तो लोकांमध्ये भीती निर्माण करत असल्याचेही तपासात समोर आले आहे. त्यामुळे वन्यजीव कायद्याचे उल्लंघन केल्याचाही संशय व्यक्त करण्यात आला आहे. ईशान्येश्वर मंदिरातील विधी, आर्थिक व्यवहार आणि इतर बाबींचा तपास अद्याप सुरू असल्याने पोलिस कोठडी आवश्यक असल्याचे सरकारी पक्षाने सांगितले.
दरम्यान, सुनावणीनंतर आरोपीला न्यायालयातून बाहेर नेत असताना परिसरात उपस्थित जमावाने त्याच्या वाहनावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली आणि मोठा अनर्थ टळला. या वेळी न्यायालय परिसरात सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. या संपूर्ण प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, पुढील तपासात आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



